“भारत ५ हजार वर्षांपासून धर्मनिरपेक्ष, मानवी वर्तनाचे सर्वोत्तम उदाहरण जगासमोर”: मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 03:13 PM2023-10-12T15:13:10+5:302023-10-12T15:15:58+5:30
RSS Mohan Bhagwat: आपल्या मातृभूमीसाठी भक्ती, प्रेम आणि समर्पण ठेवावे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
RSS Mohan Bhagwat: लोकांनी आपल्या मातृभूमीसाठी भक्ती, प्रेम आणि समर्पण ठेवावे. आम्ही मातृभूमीला आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचा एक महत्त्वाचा घटक मानतो. आपली पाच हजार वर्षे जुनी संस्कृती धर्मनिरपेक्ष आहे. हाच निष्कर्ष सर्व तत्वज्ञानामधून निघतो. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, हीच आपली भावना आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. भारत हा पाच हजार वर्षांपासून धर्मनिरपेक्ष देश आहे. भारताने लोकांमधील एकजूट आणि मानवी वर्तनाचे सर्वोत्तम उदाहरण जगासमोर ठेवले. हा केवळ सिद्धांत नाही, हे आधी लक्षात घ्या आणि मग त्यानुसार वर्तन करा, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. आपल्या देशात खूप विविधता आहे. एकमेकांशी भांडू नका. आम्ही सर्वजण एक आहोत, हा संदेश जगाला देण्यासाठी आपल्या देशाला सक्षम बनवा. हाच भारताच्या अस्तित्वाचा एकमेव उद्देश आहे, असे मोहन भागवत यांनी सांगितले.
जगाच्या कल्याणासाठी द्रष्ट्यांनी भारत निर्माण केला
जगाच्या कल्याणासाठी द्रष्ट्यांनी भारत निर्माण केला. त्यांनी एक समाज तयार केला, ज्यांनी त्यांचे ज्ञान देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले. ते फक्त संन्यासी नव्हते. ते आपल्या कुटुंबासह भटक्यांचे जीवन जगत होते. हे सर्व ‘घुमंतू’ (भटके) आजही इथे आहेत, ज्यांना इंग्रजांनी गुन्हेगारी जमाती म्हणून घोषित केले होते. ते बर्याचदा समाजात आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतात. तर काहीजण आयुर्वेदिक ज्ञान देतात, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.