“देवाची इच्छा होती म्हणून राम मंदिर झाले, देशाला जगाच्या पाठीवर...”: मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 07:27 PM2024-02-05T19:27:15+5:302024-02-05T19:30:52+5:30
RSS Chief Mohan Bhagwat: भारताने प्रगती साधली नाही तर जगाला अडचणींचा सामना करावा लागेल, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
RSS Chief Mohan Bhagwat: अयोध्येत राम मंदिराचे निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष आणि खूप त्याग केल्यानंतर २२ जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करणे शक्य झाले. आताची पिढी भाग्यवान आहे. त्यांना आता अयोध्येत रामललाचे दर्शन घेता येणार आहे. राम मंदिरांसाठी अनेकांनी प्रयत्न केलेच, पण देवाची इच्छा होती, त्यामुळेच हे होऊ शकले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहायला मिळणे हे माझे भाग्यच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
भारताला यापुढे आणखी ताकदीने पुढे यावे लागेल. जगाच्या पाठीवर भारताला आपले स्थान आणखी वरती न्यावे लागेल. भारताने प्रगती साधली नाही तर जगाला अडचणींचा सामना करावा लागेल. जग बदलत असले तरी आपण आपले मूळ विसरू नये. ज्ञान आणि विज्ञान याची आपल्याकडे परंपरा आहे. आपल्याला विश्वाला ज्ञान द्यायचे आहे. भारत विश्वगुरू होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत राहायला हवे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
श्रद्धा, भक्ती आणि समर्पण हे जनमानसात असणारे गुण
जे जे मंगल घडते आहे ती ईश्वराची इच्छा आहे. देशातील महापुरुष, संत महात्म्यांच्या सामर्थ्य आणि पुरुषार्थामुळे हे शक्य होत आहे. ही नियतीची योजना आहे. ज्ञानाचे अनुसंधान करणारे ऋषी असतात व ते सर्वत्र पोहचविण्यासाठी पुरातन काळापासून सातत्याने प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागातील बांधव हे संपूर्ण विज्ञान तंत्रज्ञान समजू शकत नाही, असे अनेकांना वाटते. परंतु ते जुन्या काळापासून अनेक छोटे छोटे विज्ञाननिष्ठ प्रयोग करीत असतात, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. श्रद्धा, भक्ती आणि समर्पण हे जनमानसात असणारे गुण आहेत. त्यात सातत्य ठेवण्याचे काम संत-विद्वान करत असतात, असेही मोहन भागवत यांनी नमूद केले.
दरम्यान, 'कोई रहे या नही रहे भारत बना रहना चाहीए', कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध, एकरस, सुखी सुंदर भारत बनवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. संत ज्ञानेश्वरांनी ईश्वर निष्ठाची मांदियाळी मागितली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे राज्य व्हावे ही 'श्रीं'ची इच्छा असे स्पष्ट केले. त्यामुळेच असे सात्त्विक कार्यक्रम होणे ही नियतीची इच्छा आहे, असे मोहन भागवत म्हणाले.