गावागावांत अयोध्येसारखे चित्र निर्माण करण्यावर RSSचा भर; गुजरातमधील कार्यकारिणी बैठकीत मंथन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 09:53 AM2023-10-27T09:53:27+5:302023-10-27T09:53:50+5:30
२२ जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या सोहळ्यानिमित्त देशभरात वातावरणनिर्मिती करून गावागावांमध्ये अयोध्येसारखेच चित्र निर्माण करण्यावर संघाचा भर राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाची बैठक गुजरातमधील भूज येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. संघाच्या इतर विषयांसोबतच या बैठकीत श्री राममंदिर प्रतिष्ठापना समारंभावर मंथन होईल. २२ जानेवारी २०२४ मध्ये होणाऱ्या सोहळ्यानिमित्त देशभरात वातावरणनिर्मिती करून गावागावांमध्ये अयोध्येसारखेच चित्र निर्माण करण्यावर संघाचा भर राहणार आहे.
या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सहसरकार्यवाह, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य, ४५ प्रातांचे संघचालक, कार्यवाह तसेच प्रांत प्रचारक उपस्थित राहतील. सोबतच संघ परिवारातील काही संघटनांचे निवडक संघटनमंत्रीदेखील सहभागी होतील. पुण्यात झालेल्या समन्वय बैठकीत विजयादशमी उत्सवात नागपुरात सरसंघचालकांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अंमलबजावणीच्या आराखड्यावर देखील चर्चा होईल, अशी माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे.
यंदाच्या बैठकीला महत्त्व
पुढील वर्षी संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे मार्च महिन्यात नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.