महिला प्रवेशासाठी आरएसएस अनुकूल
By admin | Published: March 12, 2016 04:13 AM2016-03-12T04:13:13+5:302016-03-12T04:13:13+5:30
शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर येथील मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू देण्याचा मुद्दा तापला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच त्याबाबत
योगेश पांडे, नागपूर
शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर येथील मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू देण्याचा मुद्दा तापला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच त्याबाबत भूमिका स्पष्ट करताना महिलांना सर्व मंदिरांत प्रवेश करण्याचा हक्क असल्याचे म्हटले आहे.
महिलांना प्रवेश न देण्याची परंपरा अनुचित असून, अशा मंदिर व्यवस्थापनांशी यावर चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे मत संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मांडले आहे. सोबतच या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली आहे.
राजस्थान येथील नागौर येथे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये संघाने यावर आपली बाजू मांडली आहे. भारतात प्राचीन काळापासून धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात महिला व पुरुषांचा सहज सहभाग राहिला आहे. हीच देशाची परंपरा आहे. सर्व मंदिरांत स्त्री-पुरुष भेदभाव न पाळता प्रवेश देण्यात येतो. महिलांकडून वेदाध्ययन, पौरोहित्यदेखील केले जाते. त्यामुळे त्यांना मंदिरांमध्ये प्रवेश नाकारण्याचे काहीच कारण नाही, असे प्रतिपादन भैयाजी जोशी यांनी केले आहे.
महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याची अनुचित परंपरा काही ठिकाणी दिसून येते. परंतु जेथे वाद आहेत तेथे संबंधितांशी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. विषयाचे राजकारण करणे किंवा आंदोलनाचीच भूमिका घेणे हे समस्येचे समाधान असू शकत नाही. समाज, धार्मिक क्षेत्र, मंदिर व्यवस्थापन यांच्या एकत्रित प्रयत्नांतून एकूण मानसिकताच बदलण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे, अशी सूचना संघातर्फे करण्यात आली आहे.