RSS Mohan Bhagwat: “देशासमोर अनेक आव्हाने, एक पक्ष एक नेता परिवर्तन करू शकत नाही”; मोहन भागवत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 10:05 AM2022-08-10T10:05:04+5:302022-08-10T10:06:59+5:30

RSS Mohan Bhagwat: देशाकरिता जगण्या-मरण्याची तयारी असलेले लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

rss mohan bhagwat said country facing many challenges one party and one leader can not transform | RSS Mohan Bhagwat: “देशासमोर अनेक आव्हाने, एक पक्ष एक नेता परिवर्तन करू शकत नाही”; मोहन भागवत स्पष्टच बोलले

RSS Mohan Bhagwat: “देशासमोर अनेक आव्हाने, एक पक्ष एक नेता परिवर्तन करू शकत नाही”; मोहन भागवत स्पष्टच बोलले

Next

Maharashtra Political Crisis: एकीकडे देशातील विविध राज्यांमध्ये राजकीय सत्तासंघर्ष पराकोटीला पोहोचलेला असताना, विरोधकांकडून अनेकविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. देशापुढे अनेक आव्हाने उभी असतात. एक पक्ष, एक नेता या सगळ्या आव्हानांवर मात करू शकत नाही किंवा परिवर्तन घडवून आणू शकत नाही. ज्यावेळी समाज देशासाठी जगायला, मरायला तयार होतो, त्याचवेळी परिवर्तन घडून येते, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. 

प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन, ‘स्व’चे स्पष्ट भान, राष्ट्राबद्दलच्या कल्पना व देशाकरिता जगण्या-मरण्याची तयारी असलेले लोक संघात असल्याचेही मोहन भागवत यांनी सांगितले. देशापुढे आज अनेक आव्हाने आहेत. देशात मोठ्या प्रमाणात विविधता असून, या सगळ्यांना जोडण्यासाठी, संघटित करण्याची मोठी जबाबदारी समाजावर आहे. समाजानेही आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार, संस्था, संघावर अवलंबून न राहता स्वावलंबी झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शतकाकडे वाटचाल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शतकाकडे वाटचाल करीत असून, विपरीत परिस्थितीत सर्वांना जोडण्याचे काम सातत्याने करीत आला आहे. संघाला काही गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. जबाबदारी घेणारा समर्थ हिंदू समाज निर्माण झाला पाहिजे, या विचारातून संघाची स्थापना झाली. कोणताही नेता समाजाची निर्मिती करीत नाही, तर समाज नेता तयार करीत असतो. सर्व प्रकारच्या उपेक्षा आणि विरोधातून संघ आता अनुकूलतेच्या स्थितीत आला आहे. एक प्रचंड मोठे संघटन उभे झाले आहे. अशा स्थितीत कालच्या विरोधकांनाही जोडून घेण्यावर भर देण्याची गरज आहे. प्रामाणिकपणा, देशभक्ती, शिस्त, स्व आणि राष्ट्राची स्पष्ट कल्पना आणि देशासाठी मरण्याची भावना, हे गुण असणारा समाज निर्माण करावयाचा आहे. अनुभवाच्या कसोटीवर संघाचे काम सिद्ध झाले आहे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ध्येयनिष्ठा, आत्मीयता, अनुशासन आणि आपपरभाव नसणे, हा संघाचा स्वभाव असून, ज्या उद्देशाने डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली तो उद्देश कार्यपूर्तीपर्यंत तसाच राहील, असा विश्वास मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच ईशान्य भारताचा उर्वरित भारताशी रामायण आणि महाभारतकालापासून संबंध आहे. मात्र, नंतरच्या काळात या संबंधांची आपण उपेक्षा केली आणि त्यातून त्या प्रदेशात समस्या निर्माण झाल्या. कोणतेही आव्हान आततायीपणे काम करून दूर होत नाही. त्यासाठी दीर्घदृष्टीने काम करावे लागते. असे काम संघाने ईशान्य भारतात ४० वर्षांपूर्वी सुरू केले आणि त्याचे परिणाम आता दिसून येत आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले.
 

Web Title: rss mohan bhagwat said country facing many challenges one party and one leader can not transform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.