“...तोपर्यंत आरक्षण कायम राहायला हवे”; RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 12:21 PM2023-09-07T12:21:44+5:302023-09-07T12:23:07+5:30
RSS Mohan Bhagwat: संविधानाने जे आरक्षण दिले आहे, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण पाठिंबा आहे, असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.
RSS Mohan Bhagwat: जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्लाचा निषेध संपूर्ण राज्यभरात नोंदवला गेला. याविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने, घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाज आरक्षणासाठी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आरक्षणाबाबतराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक मोठे विधान केले आहे.
सामाजिक व्यवस्थेमध्ये आपण आपल्या बांधवांना मागे टाकले आहे. आपण त्यांची काळजी घेतली नाही. गेल्या २००० वर्षांपासून असेच चालत आले आहे. जोपर्यंत आपण त्यांना समानतेने वागवत नाही, तोपर्यंत काही विशेष गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यापैकीच एक आरक्षण आहे. जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम असायला हवे. जोपर्यंत समाजात भेदभाव अस्तित्वात आहे. तोपर्यंत आरएसएसचा संविधानात दिलेल्या आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे. भेदभाव दिसत नसला तरी समाजात तो प्रचलित आहे, असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले.
आरक्षणासारखे उपाय करणे आवश्यक आहे
जेव्हा वंचित समाजातील व्यक्ती राष्ट्रपती झाली. देशाच्या, मग आरक्षणाची गरज काय? जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या आहेत, तर आरक्षण का रद्द केले जात नाही? असा प्रश्न एका विद्यार्थाने विचारला. यावर बोलताना, आपल्या देशात सामाजिक विषमतेचा इतिहास लक्षात घेऊन आरक्षण दिले गेले आहे. ज्यांनी भेदभाव केला. आमच्यासोबत राहिले, त्यांना मागे ठेवले, त्यांची आपण काळजी केली नाही आणि हे असेच दोन हजार वर्षे चालले. त्यामुळे त्यांना बरोबरीत आणेपर्यंत आरक्षणासारखे उपाय करणे आवश्यक आहे, असे मोहन भागवत म्हणाले. हे केवळ आर्थिक किंवा राजकीय समानता सुनिश्चित करण्यासाठी नाही, तर सन्मान देण्यासाठी आहे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.
दरम्यान, संविधानानुसार जे आरक्षण आहे, त्याला संघाचा पूर्ण पाठिंबा आहे. जरी भेदभाव दिसत नसले तरी भेदभाव अजूनही आहे. आरक्षणामुळे मोठ्या नोकऱ्या मिळत असल्या तरी भेदभाव अजूनही कायम आहे. हिंदू समाजात सर्वांसाठी मंदिर, पाणी, स्मशानभूमी, जमीन एक असली पाहिजे. अशी परिस्थिती संघाच्या शाखा आणि इतर ठिकाणी निर्माण होणे गरजेचे आहे. ज्यांना आरक्षण मिळते त्यातही काही लोक उभे राहून म्हणू लागले आहेत की, आरक्षणामुळे आम्ही सक्षम झालो आहोत, आता आम्हाला आरक्षणाची गरज नाही. म्हणून ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण द्या, असे मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले.