BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 10:10 PM2024-11-13T22:10:37+5:302024-11-13T22:11:18+5:30

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा एक आठवडा उरला आहे.

RSS plans for BJP's victory; 1-2-3 formula made for each constituency | BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला

BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला

RSS Plan For BJP : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा एक आठवडा उरला आहे. एकीकडे महाविकास आघाडी आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नेतृत्वातील महायुती मैदानात आहे. दरम्यान, आता भाजपच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवस संघ धावून आला आहे. या आठवड्यासाठी संघाने विशेष तयारी केली आहे. संघाने एक रणनिती आखली असून, याद्वारे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न होणार आहे.

संघाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राची विभागणी विदर्भ, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, या चार प्रांतांमध्ये करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, निवडणुकीसाठी चारही प्रांतातील प्रांताधिकाऱ्यांवर त्या-त्या विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक प्रांताधिकाऱ्याकडे दोन विधानसभांची जबाबदारी देण्यात आली आहे.

काय आहे 1-2-3 चा फॉर्म्युला?
संघाच्या रणनितीनुसार, विविध विभागातील अधिकाऱ्यांनाही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विभागातील दोन अधिकाऱ्यांना एका विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे रणनीतीनुसार प्रत्येक विधानसभेत संघाचे 3 अधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे तिन्ही अधिकारी भाजप आणि सर्व सहयोगी संघटनांशी उत्तम समन्वय साधण्यासाठी रणनीती तर बनवतीलच, पण बूथ स्तरावर नाराज आणि निष्क्रिय स्वयंसेवकांना एकत्र करण्याचे कामही करतील.

संघाने एबीसीडी गटात सर्व बूथचे वाटप केले
मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक बूथनुसार रणनीती बनवण्यात आली आहे. बूथ चार गट ABCD मध्ये विभागले आहेत. अ आणि ब हे बूथ पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे या बूथवर 100% मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी प्रत्येक बूथवर भाजपशिवाय दोन टीम खासकरुन मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याचे काम करणार आहेत. याशिवाय क गटात अशी बूथ ठेवण्यात आली आहेत, ज्यात पूर्वीपेक्षा 10 टक्के मते वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. तर, नकारात्मक झोनमध्ये येणाऱ्या ड गटासाठी विशेष रणनीती आखण्यात आली आहे.

विविध समाजातील प्रमुखांच्या भेटी
लोकसभा निवडणुकीत जैन आणि मारवाडी मतदारांनी NOTA वर अधिक भर दिला होता, त्यामुळे संघाचे अधिकारी या समुदायांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या मुल्यांकनानुसार यावेळी जातीय राजकारणाला गती मिळू नये, यासाठी संघ विशेष काळजी घेत आहे. यासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध जाती-समुदायातील प्रमुख व्यक्तींशी सातत्याने संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. 

हरयाणाच्या निकालातून घेतले धडे
संघ प्रत्येक बूथ स्तरावर 50-50 युवा परिषदा आणि महिला माता परिषदा आयोजित करत आहे. हरियाणातील धक्कादायक विजयामागे ग्राउंड झिरोवर मायक्रो मॅनेजमेंटची संघाची रणनीती असल्याचे मानले जात असले तरी हरियाणाची महाराष्ट्राशी तुलना करणे योग्य होणार नाही, असे संघाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र हे खूप मोठे राज्य आहे आणि इथली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती तिथल्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे संघाने येथे वेगळ्या पद्धतीने जनजागृती मोहीम सुरू केली असून, वेगळ्या रणनीतीवर काम केले जात आहे.

Web Title: RSS plans for BJP's victory; 1-2-3 formula made for each constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.