आरएसएसने राज्याचे तुकडे करण्याऐवजी सर्वांगीण विकासाचा प्रस्ताव द्यावा : पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:44 AM2020-01-13T10:44:28+5:302020-01-13T10:45:34+5:30
जातनिहाय जनगणनेमुळे जाती-जातीतील भांडणे संपुष्टात येतील असा विश्वास व्यक्त करत पटोले यांनी जातनिहाय जनगणनेच्या ठरावाचे महत्त्व सांगितले.
मुंबई - विधासभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून टीका केली. तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे सरकार असल्याचं पटोले म्हणाले. संगमनेर येथे अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार समारंभात ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्या प्रस्तावाऐवजी राज्याच्या सर्वांगीन विकासाचा प्रस्ताव द्यावा, असे आवाहन पटोले यांनी केले. यावेळी त्यांनी विभाजनाच्या मुद्दावरून आरएसएसवर हल्ला चढवला. संघाच्या मा.गो. वैद्य यांनी राज्याचे चार राज्यांमध्ये विभाजन करण्याचे वक्तव्य केले होते. त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे करण्याऐवजी सर्वांगीण विकासाचे प्रस्ताव द्यावे, असं नाना पटोले यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला ब्रह्मा, विष्णू आणि महेशचे सरकार म्हटले. या सरकारने सर्वप्रथम शेतकरी कर्जमाफी करून मोठा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. तसेच जातनिहाय जनगणनेमुळे जाती-जातीतील भांडणे संपुष्टात येतील असा विश्वास व्यक्त करत पटोले यांनी जातनिहाय जनगणनेच्या ठरावाचे महत्त्व सांगितले.