‘आरटीई’चे प्रवेश जानेवारीत , प्राथमिक शिक्षण उपसंचालकांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 07:06 AM2017-12-22T07:06:22+5:302017-12-22T07:06:52+5:30
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के आरक्षणांतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या...
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के आरक्षणांतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत काही दिवस आधीच ही प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी दिली.
खासगी शाळांकडून यापूर्वी पूर्व प्राथमिक तसेच इयत्ता पहिलीची प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पालकांकडून आरटीईची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाकडे सातत्याने विचारणा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, विभागाकडून यंदा लवकर ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयने आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक तयार केले आहे. त्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने पाठविला आहे. त्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश सुरू केले जाणार आहेत. मागील वर्षी १६ जानेवारीपासून आरटीई प्रवेशाला सुरुवात झाली होती. याही वर्षी वेळेत प्रवेश सुरू होतील, अशी शक्यता आहे.