राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया पहिल्याच दिवशी फसली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 07:40 PM2019-03-05T19:40:05+5:302019-03-05T19:45:52+5:30
राज्यभरातील ९ हजार शाळांमधील पहिल्या सव्वा लाख जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिलीच्या दुर्बल आणि वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रिया पहिल्याच दिवशी फसली आहे. मंगळवारी पालकांनी आरटीईच्या संकेतस्थळावरून अर्ज भरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अर्जच भरता आले नाहीत. त्यामुळे पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
राज्यभरातील ९ हजार शाळांमधील पहिल्या सव्वा लाख जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाच्या जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवारपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार होते. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करीत असलेल्या पालकांनी त्यानुसार मंगळवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अर्ज भरता आलेले नाहीत. राज्यभरातील अनेक जिल्हयांमध्ये हीच परिस्थिती राहिली.
आरटीई प्रवेश अर्ज भरताना पालक राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता गुगल मॅपवर दर्शवायचा आहे. मात्र गुगलच्या बदलेल्या धोरणानुसार आता गुगल मॅपचा वापर करावयाचा झाल्यास त्यासाठी पैसे भरावे लागणार आहेत. शिक्षण विभागाने त्याचे पैसे भरले नसल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यात पहिल्या दिवशी अडचणी आल्याचे शिक्षण विभागातील सुत्रांनी सांगितले.
संकेतस्थळावरून अर्ज भरण्यास पालकांना असंख्य अडचणी येत असतानाही शिक्षण विभागाकडून तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरता येत नसल्याबाबत पालकांना काहीच माहिती दिली नाही.
मागील वर्षी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया जानेवारी महिन्यातच सुरू करण्यात आली होती, मात्र यंदा त्यास दोन महिने विलंब झाला आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लॉटरी पध्दतीने आरटीईच्या फेºया पूर्ण होण्यास दोन ते महिने लागण्याची शक्यता आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश न मिळल्यास पालकांना इतर शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मोठया त्रासाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे किमान आता तरी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया लवकर मार्गी लागण्याची मागणी पालकांनी केली आहे.