राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या मागास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 03:16 AM2020-02-25T03:16:47+5:302020-02-25T03:16:58+5:30

मोबाइल अ‍ॅप्लिकेशनला शून्य प्रतिसाद; तांत्रिक अडचणींचा पाढा सुरूच, पालकांमध्ये नाराजीचा सूर

The RTE admission process in the state is technically backward | राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या मागास

राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या मागास

Next

मुंबई : राज्यात शिक्षण हक्क कायदा (आरटीई) प्रवेशासाठी अर्ज नोंदणी सुरू असून सोमवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत १ लाख ८५ हजारांहून अधिक नोंदणी झाली आहे. मात्र ही नोंदणी आॅनलाइन झाली असून आरटीई मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवरून मात्र शून्य अर्जाची नोंद आहे.

आरटीईसाठीची नोंदणी प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत ती सुरू राहील. मोबाइल अ‍ॅप सुरूच न होणे, रहिवासी पत्ता आणि त्याप्रमाणे नकाशामध्ये योग्य जागा न दाखविणे, निवासी परिसरातील शाळांची योग्य यादी न दाखविणे, वारंवार अ‍ॅप हँग होणे अशा तांत्रिक अडचणींमुळे आरटीईच्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनला पालकांचा शून्य प्रतिसाद मिळाला आहे.

दुर्बल व वंचित घटकातील बालकांना आरटीईअंतर्गत चांगले शिक्षण मिळावे, आरटीई प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी, पालकांना सायबरमध्ये जावे लागू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत मोबाइल अ‍ॅप्लिकेशन पालकांसाठी अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले. आरटीई संकेतस्थळावरही याची लिंक उपलब्ध आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे या पालकांमध्ये नाराजी असून त्यांनी या अ‍ॅपकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड होतानाच अडचणींना सुरुवात होत असल्याची प्रतिक्रिया मुक्तार अन्सारी या पालकाने दिली. या सर्व प्रक्रियेत दोन दिवस वाया गेले आणि अर्ज करायला उशीर झाला. शेवटी तारीख चुकू नये म्हणून पाल्याचा अर्ज सायबर कॅफेमध्ये जाऊन भरावा लागल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

संकेतस्थळावर अर्ज भरूनही मोबाइलवर मेसेज येत नाही. विभागीय केंद्रांवरही या समस्येमुळे अधिकारी त्रासले आहेत. पालक अडचणी घेऊन आले तरी यंत्रणेत तांत्रिक अडचणी असल्याने काहीही करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

मार्गदर्शनपर हिडीओजचा अभाव
पालकांना आरटीईसाठी अर्ज कसे करावे? अर्जात कोणती माहिती कशी द्यावी? यासंदर्भात माहिती देणारे व्हिडीओज मागील वर्षी मराठी तसेच हिंदी भाषांत संकेतस्थळावर देण्यात आले होते. मात्र यंदा संकेतस्थळावर हे मार्गदर्शनपर व्हिडीओही उपलब्ध नाहीत. त्यामुळेही अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मत काही पालकांनी व्यक्त केले.

Web Title: The RTE admission process in the state is technically backward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.