आरटीई प्रवेशासाठी बुधवारपासून स्वीकारणार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 07:30 PM2020-02-11T19:30:53+5:302020-02-11T19:39:08+5:30
शाळांमधील १६ हजार ५१ जागांवर प्रवेश दिले जाणार
पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)२५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ११३ शाळांनी नोंदणी केली असून या शाळांमधील १ लाख १२ हजार ९५७ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी येत्या बुधवारपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जाण्याची शक्यता आहे. तर मार्च महिन्यात प्रवेशाची सोडत काढली जाईल,असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रकिया राबविली जात असून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शाळांची नोंदणी सुरू आहे. त्यानुसार पुण्यातील सर्वाधिक ९२१ शाळांनी नोंदणी केली असून या शाळांमधील १६ हजार ५१ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यात आणखी काही शाळांची वाढ होण्याची शक्यता आहे.पुण्यापाठोपाठ ठाणे, नागपूर आणि औरंगाबाद या शहरात आटीई प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या शाळांची संख्या मोठी आहे. राज्य शासनाकडून शाळांना शुल्क परताव्याची रक्कम दिली जात नसल्याने शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी करण्यास नकार दिल्याचे दिसून आले आहे.परंतु,सर्व शाळांनी आरटीईमध्ये सहभागी व्हावे,यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहे.
------------
आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या शाळांची जिल्हानिहाय माहिती :- यवतमाळ २०० , वाशिम ९९, वर्धा १२२ , ठाणे ६६८ , सोलापूर ३२९, सिंधूदूर्ग ५१ , सातारा २३६ , सांगली २२६ , रत्नागिरी ९० , रायगड २६२, पुणे ९२१ , परभणी १४७ , पालघर २६९, उस्मानाबाद १३१, नाशिक ४४६, नंदुरबार ४४, नांदेड २३१ , नागपूर ६७३ , मुंबई २९२, लातूर २३५, कोल्हापूर ३४० , जालना २५३ , जळगाव २८६ , हिंगोली ६९, गोंदिया १४१, गडचिरोली ६१, धुळे १०३, चंद्रपूर १९७, बुलढाणा ९३, बीड २२०, भंडारा ९३, औरंगाबाद ५४४, अमरावती २४०,अकोला २००, अहमदनगर ३९३,
---------------------------
शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशासाठी शाळांचे नोंदणीचे काम सुरू असून बुधवारपासून पालकांना आरटीई प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. तसेच दिलेल्या मुदतीत प्राप्त होणा-या अर्जांचा विचार करून प्रवेशासाठी राज्यात एकच सोडत काढली जाणार आहे. दिनकर टेमकर ,सह संचालक ,प्राथमिक शिक्षण, महाराष्ट राज्य