‘आरटीई’चे सर्व्हर बंद
By admin | Published: March 10, 2016 03:59 AM2016-03-10T03:59:13+5:302016-03-10T03:59:13+5:30
शासनाने शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी शिक्षण हक्क कायद्याची (आरटीई) आॅनलाइन प्रक्रिया २९ फेब्रुवारीपासून जाहीर केली, परंतु वेबसाइटच अपडेट नसल्यामुळे नाशिक सोडल्यास
नागपूर : शासनाने शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी शिक्षण हक्क कायद्याची (आरटीई) आॅनलाइन प्रक्रिया २९ फेब्रुवारीपासून जाहीर केली, परंतु वेबसाइटच अपडेट नसल्यामुळे नाशिक सोडल्यास संपूर्ण राज्यातील ‘आरटीई’ची प्रक्रिया खोळंबली आहे. त्यातच सर्व्हरवर डॉक्युमेंट अपलोडचा भार पडल्याने ते बंद पडले आहे.
शिक्षण विभागाकडून पुढच्या प्रक्रियेसंदर्भात कुठल्याही सूचना नसल्याने, पालकांनी या प्रक्रियेवर संताप व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीसुद्धा सर्व्हर बंद पडल्यामुळे ‘आरटीई’च्या प्रक्रियेत अडचणी आल्या होत्या. यंदाही ‘आरटीई’ला सर्व्हरचा फटका बसला आहे.
‘आरटीई’अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नामांकित शाळेत २५ टक्के कोटा आरक्षित करण्यात आला आहे. ही प्रक्रिया आॅनलाइन करण्यात आली आहे. २९ फेब्रुवारी ते ९ मार्चपर्यंत शाळांना आॅनलाइन नोंदणी करायची होती, तर ११ ते २८ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करायचे होते, परंतु वेबसाइट कार्यान्वित नसल्याने शाळांची नोंदणी झालेली नाही. वेबसाइटवर नाशिक जिल्ह्यातील शाळा नोंदणी कार्यक्रमाचा अवधी दिला आहे. इतर जिल्ह्यांसाठी कालावधी कळविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. नागपूर जिल्ह्यात ‘आरटीई’ची जबाबदारी सांभाळत असलेले प्राथमिक शिक्षण अधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी सांगितले की, ‘वेबसाइट बंद असल्यामुळे जिल्ह्यातील एकाही शाळेची नोंदणी झालेली नाही.’ (प्रतिनिधी)