आरटीआय कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या
By admin | Published: October 17, 2016 05:45 AM2016-10-17T05:45:54+5:302016-10-17T05:47:32+5:30
माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र हिरजी वीरा (वय ६१) यांची शनिवारी रात्री वाकोल्यातील कलिना मशीदजवळील राहात्या घरी गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.
मुंबई : प्रामुख्याने पश्चिम उपनगरातील अनधिकृत बांधकामे व भूमाफिया यांच्याविरुद्ध सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र हिरजी वीरा (वय ६१) यांची शनिवारी रात्री वाकोल्यातील कलिना मशीदजवळील राहात्या घरी गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. जमिनीच्या वादातून सहा अज्ञात मारेकऱ्यांनी घरात घुसून हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळणे अद्याप शक्य झालेले नाही.
वीरा हे घरात टीव्ही पाहात बसलेले असताना हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी एक पुंगळी मिळाली असून, ती फोरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचा सामाजिक संघटना व आरटीआय कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. वीरा यांनी भूमाफियांविरुद्ध सुरू केलेल्या लढाईमुळे त्यांच्याकडून हे कृत्य केले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भांडी बनविण्याचा व्यवसाय असलेले भूपेंद्र हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत होते. विशेषत: परिसरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण, भूमाफिया व बेकायदेशीर कामांविरुद्ध ‘आरटीआय’च्या माध्यमातून पुरावे जमवत सातत्याने आवाज उठवित होते. महापालिका, म्हाडा, एसआरएच्या गैरकारभाराबाबत ते लोकायुक्त, मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयापर्यंत निवेदन देत त्यांचा पाठपुरावा करीत होते. ते ‘व्हाइस आॅफ कलिना एएलएम’ या संस्थेचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांच्यामुळे या परिसरातील अनेक अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरुद्ध प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले होते. त्यामुळे दुखावले गेलेल्या बिल्डर, माफियांकडून त्यांना अनेकवेळा धमक्या येत होत्या. त्याबाबत वीरा यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र धमक्यांना न घाबरता ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. शनिवारी रात्री ते सांताक्रुझ (पूर्व) वाकोला येथील कलिना मशीदच्या मागे असलेल्या रज्जाक चाळीतील रूम नं. ३/८ या आपल्या घरी बेडरूममध्ये टीव्ही बघत बसलेले होते. त्यांची पत्नी रंजना या किचनमध्ये काम करीत होत्या. पावणे दहा ते दहाच्या सुमारास सहा जण थेट त्यांच्या खोलीत शिरले. ते त्यांना अटकाव करेपर्यंत त्यापैकी एकाने त्यांच्या मस्तकावर गोळी झाडली. भूपेंद्र रक्तबंबाळ होऊन कोसळल्यानंतर हल्लेखोर निघून गेले. पत्नी रंजना यांनी आरडाओरड करीत शेजाऱ्यांना तसेच कुर्ला येथील काजुपाडा पाइपलाइनजवळ राहात असलेली मुलगी व जावई सुधीर गाला यांना कळविले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झालेले होते.
निपचिप पडलेल्या वीरा यांना खासगी वाहनातून व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भूपेंद्र वीरा यांच्या हत्येचे वृत्त समजताच घटनास्थळ व रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी मोठी गर्दी केली.
>दोन-तीन फुटांवरून गोळी
भूपेंद्र यांच्यावर जेमतेम २ ते ३ फुटांच्या अंतरावरून गोळी झाडण्यात आली असून, त्यांच्या कपाळाच्या उजव्या बाजूने डोक्यात घुसून डाव्या कानाच्या वरच्या बाजूने बाहेर पडली. खोलीच्या एका कोपऱ्यात पुंगळी मिळाली असून, सर्व खोलीत रक्ताचे डाग पडले होते.
>सायलेन्ट रिव्हॉल्व्हरमधून हत्या
आरटीआय कार्यकर्ते वीरा राहात असलेली चाळ ही नेहमी गर्दीने गजबजलेली असते. या ठिकाणी दाटीवाटीने लोक राहतात. मात्र मारेकरी निघून जाईपर्यंत कोणालाही हल्ल्याची कल्पना आली नाही. त्याचप्रमाणे हत्येवेळी त्यांची पत्नी रंजना या दुसऱ्या खोलीत असताना त्यांनाही गोळीबार झाल्याचा आवाज आला नाही. त्यामुळे हल्लेखोरांनी सायलेन्सर बसविलेली रिव्हॉल्व्हर वापरली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भूपेंद्र यांच्या ४०हून अधिक तक्रारी
अनधिकृत बांधकामे व भूमाफियांविरुद्ध तसेच महापालिका, म्हाडा, एसआरएतील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ते सातत्याने आवाज उठवित होते. त्यामुळे त्यांना आजवर किमान ३५ ते ४० वेळा धमक्या आल्या होत्या. त्याबाबत त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. पोलीस मात्र केवळ अदखलपात्र (एनसी) नोंदवून घेत, मात्र संबंधितांवर काहीच कारवाई केली नाही. त्याचप्रमाणे भूपेंद्र यांना संरक्षण पुरविण्यात कधीच स्वारस्य दाखविले नसल्याचा आरोप त्यांचे सहकारी कमलाकर शेणॉय यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
राज्य आयोगाने दखल घ्यावी : शैलेश गांधी यांची मागणी
माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या त्यांच्याच घरात गोळ््या घालून करण्यात आलेल्या निर्घृण खुनाची राज्य माहिती आयोगाने माहिती अधिकार कायद्याच्या कलम १८ अन्वये स्वत:हून गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी स्वत: आरटीआय अधिकारांसाठी लढणारे माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी केली आहे.
राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये गांधी यांनी म्हटले की, ‘विरा यांच्या खुनाचा तपास करून खुन्यांना अटक करण्याचा आदेश पोलिसांना द्यावा, वीरा यांनी अनधिकृत अतिक्रमणांची माहिती घेण्यासाठी महापालिका, एसआरए व लोकायुक्तांकडे केलेले जे अर्ज प्रलंबित आहेत त्यात त्यांनी मागितलेली माहिती, ते हयात नसले तरी लगेच देण्याचे निर्देश संबंधित माहिती आधकाऱ्यांना द्यावेत.’
>जागामालकाशी वाद : भूपेंद्र वीरा राहात असलेल्या खोलीचे जागा मालक रझाक अब्बास खान याच्याशी त्यांचा जमिनीच्या हक्कावरून वाद सुरू होता. त्याबाबत आलेल्या धमक्यांविरुद्ध त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याचप्रमाणे खान याच्या अनधिकृत बांधकामाबाबत लोकायुक्तांनी महापालिकेला त्यावर कारवाई करण्याची सूचना केल्यानंतर शनिवारी पालिकेने त्याबाबत नोटीस पाठविली होती. त्यामुळे वीरा हे आनंदात होते. मात्र रात्रीच त्यांची मारेकऱ्यांनी हत्या केली. हत्येच्या घटनेनंतर जागा मालक रझाक खान हा तातडीने प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात अॅडमिट झाला आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची चर्चा सुरू आहे.
>मुंबईतील पहिलीच घटना
माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याचे प्रकार राज्यभरात वाढत आहेत. पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते सुरेश शेट्टी यांच्यासह अनेकजणांच्या हत्या झाल्या आहेत. मात्र मुुंबईतील आरटीआय कार्यकर्त्यांवर हल्ले होत असले तरी हत्या होण्याची ही पहिलीच घटना आहे. भुपेंद्र विरा यांना यापूर्वी अनेकवेळा धमक्या आल्या असल्या तरी त्यांच्यावर हल्ला झाला नव्हता.
गुन्हा अन्वेषण शाखेकडे तपास देण्याची मागणी
आरटीआय कार्यकर्ते विरा यांच्या हत्या ही लोकशाहीवरील हल्ला असून मारेकऱ्यांचा सर्वस्तरातून निषेध करण्यात येत आहे. त्याबाबतचे फलक रविवारी ठिकठिकाणी लावण्यात आले. विरा यांच्या हत्येचा तपास तातडीने गुन्हा अन्वेषण शाखेकडून करण्यात यावा, अशी मागणी माहिती अधिकार मंच व पोलीस रिफॉर्म वॉच स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आली आहे.
>भूमाफियांना सुपारी
विरा हे सातत्याने बेकायदेशीर बांधकामे, भूखंड माफीया यांचे गैरकृत्यावर आवाज उठवित होते. त्याचप्रमाणे त्यांनी सहकार्य करणाऱ्या महापालिका, एसआरए, म्हाडातील अधिकाऱ्यांविरुद्ध लोकायुक्त, मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांच्यामुळे प्रशासनाला अनेक बेकायदेशीर प्रकरणावर कारवाई करणे भाग पडले होते. त्यामुळे भूमाफियाकडून सुपारी देऊन त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्याकडून करण्यात येत आहे. तर पोलीस या प्रकरणातील संशयित रझा अब्बास खान याला पाठीशी घालत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी केला. त्यांनी रविवारी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. वाकोला येथील वरिष्ठ निरीक्षकांकडे विचारणा केली असता ते अपुरी माहिती देत असल्याचा आरोप केला.
>व्हिसलब्लोअर अॅक्टची अंमलबजावणी करा
माहिती अधिकार कार्यकत्यांवरील भ्याड हल्ले रोखण्यासाठी ‘व्हिसलब्लोअर’ कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते अमित मारु यांच्या मते, वीरा यांच्या बाबत जे झाले ते चुकीचे झाले. माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्यासाठी अशा प्रकारचे हल्ले करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात व्हिसल ब्लोअर कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अशा अप्रिय घटनांमुळे सरकारची गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर जरब राहिलेली नसल्याचे दिसून येते.
>भ्रष्ट अधिकाऱ्यांना माहितीच्या अधिकारामुळे धाबे दणाणल्याचे दिसून आल्याने भ्रष्ट अधिकारी वा भू-माफिया कार्यकर्त्यांवर हल्ला करतात. मुळात माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. हा हल्ला निंदनीय आहे. हल्ले रोखण्यासाठी व्हिसलब्लोअर कायद्याची अमंलबजावणी हाच एकमेव मार्ग आहे.
- मोहम्मद अफजल, ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते
>माहिती अधिकार कार्यकर्त्यांसाठी महाराष्ट्र असुरक्षितच आहे. राज्यातील ५५ टक्के पोलिस यंत्रणा नेत्यांच्या संरक्षणासाठी गुंतलेली असताना सामान्य जनतेसाठी काम करणारे कार्यकर्त्यांचे जीव धोक्यात आहेत.
- समीर झवेरी, माहिती अधिकार कार्यकर्ते
माहिती अधिकार कार्यकत्यांच्या संरक्षणाची मागणी योग्य आहे. मात्र सुमारे ६०-७० टक्के कार्यकर्ते भ्रष्ट असल्याने त्या दुष्टीने विचार करणे गरजेचे आहे. माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्यांविरोधात सरकारने ठोस पावले उचलणे गरजे आहे.
- जयंत जैन, ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते
वीरा यांच्या हत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सर्व बाबी पडताळून बघितल्या जात आहेत. त्याचप्रमाणे त्यांना यापूर्वी कोणाकडून धमक्या आल्या होत्या, त्यांचा कोणाशी वाद होता याची माहिती घेतली जात आहे. यासंबंधी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे.
- वीरेंद्र मिश्रा, पोलीस उपायुक्त, परिमंडळ - ८