आरटीओ अधिकाऱ्यांची पळापळ

By admin | Published: December 22, 2014 03:54 AM2014-12-22T03:54:50+5:302014-12-22T03:54:50+5:30

या छाप्याची आरटीओमध्ये जोरदार चर्चा असून प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्याने दिलेली माहिती धक्कादायक असून, सरप्राईज भेटीची कहाणी हिंदी सिनेमात शोभावी अशी आहे.

RTO officials move | आरटीओ अधिकाऱ्यांची पळापळ

आरटीओ अधिकाऱ्यांची पळापळ

Next



अतुल कुलकर्णी ल्ल मुंबई
परिवहन विभागाच्या सीमा तपासणी नाक्यावर दररोज तब्बल २० लाखांची मलई परस्पर फस्त होत असल्याने महिन्याला करोडोंचा फटका सरकारी तिजोरीला बसत आहे. गुजरात बॉर्डरवरील आच्छाड सीमा तपासणी नाक्यावर परिवहन आयुक्तांनी दिलेल्या सरप्राइज भेटीनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) हा गोरखधंदा उघड झाला आहे. ट्रकमधून आयुक्त उतरताना पाहून युनिफॉर्ममधील आरटीओ अधिकारीच पळत असल्याचे पाहून चक्क ट्रक ड्रायव्हर टाळ्या वाजवत होते.
या छाप्याची आरटीओमध्ये जोरदार चर्चा असून प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्याने दिलेली माहिती धक्कादायक असून, सरप्राईज भेटीची कहाणी हिंदी सिनेमात शोभावी अशी आहे. सीमा तपासणी नाक्यांवर पैसे गोळा करणाऱ्या दलालांना थारा देऊ नका, असे आदेश आयुक्त महेश झगडे यांनी दिले होते. या आदेशाचे पालन होते का, हे पाहण्यासाठी आयुक्त एका खासगी गाडीतून आपल्या बॉडीगार्डसह निघाले. आच्छाड सीमा तपासणी नाक्याच्या अलीकडे त्यांनी गाडी थांबवून एक ट्रक थांबवला. टीशर्ट आणि जीन्स घातलेले आयुक्त आणि क्लिनरसारखा वेष केलेला बॉडीगार्ड त्यात बसले. आच्छाड नाक्याचा रस्ता आठ पदरी आहे. त्या ठिकाणी गाड्या वाट्टेल तशा जात होत्या. पहिल्या दोन लेनमधून ओव्हरलोड ट्रक जात होते. आयुक्त ज्या ट्रक मध्ये बसले होते, तो ट्रक नाक्यावर गेला. तेथे कागदपत्रे पाहणाऱ्याने ड्रायव्हरला आतल्या खोलीत जायला सांगितले. आतमध्ये त्याच्याकडून तीनशे रुपये घेतले गेले.
‘त्याची पावती घे’, असे आयुक्तांनी ड्रायव्हरला सांगितले व ते ट्रकमधून खाली उतरले. त्यांना पहाताच ‘रेड पडली, रेड पडली’ असे म्हणत सगळे दलाल आणि युनिफॉर्ममधील अधिकारी देखील सुसाट पळत सुटले. यादरम्यान तेथे गर्दी जमली होती व अधिकाऱ्यांना दप्तर टाकून पळताना पाहून ट्रक ड्रायव्हरच टाळ्या वाजवत असल्याचे दृष्य तेथे पाहायला मिळाले. जमलेल्या ट्रक ड्रायव्हरनी रोज कसे पैसे द्यावे लागतात याच्या सुरस कहाण्या लिहून दिल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. नंतर एक आरटीओ आले. त्यांनी भीत भीत या नाक्याची कहाणी सांगितल्याचे वृत्त आहे.
आच्छाड सीमा तपासणी नाक्यापासून काही अंतरावर गुजरात सरकारचा सीमा तपासणी नाका आहे. तेथे मात्र प्रत्येक ट्रकचे वजन जागेवरच असलेल्या काट्यांवर होत होते. त्यासाठीची स्वतंत्र यंत्रणा, कर्मचारी तेथे उपलब्ध असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. याबाबत आयुक्त झगडे यांना विचारले असता ते म्हणाले, आपण ट्रकमध्ये जाऊन भेट दिली हे खरे आहे; पण अधिवेशन सुरू असल्याने यावर बोलणे योग्य होणार नाही. या सगळ्या प्रकारावर आता चालू अधिवेशनात विरोधी पक्षनेते कोणती भूमिका घेतात हे पहाणे महत्वाचे असेल. आघाडी सरकारमध्ये हे खाते काँग्रेसकडे व त्यातही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होते. आता युती सरकारमध्ये हे दिवाकर रावते यांच्याकडे आहे.

Web Title: RTO officials move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.