अंबाबाई मूर्तीच्या गळ्यापर्यंत किरणे
By admin | Published: November 10, 2016 11:37 PM2016-11-10T23:37:56+5:302016-11-10T23:59:53+5:30
दक्षिणायन सोहळा : दुसऱ्या दिवशी किरणोत्सवाची तीव्रता १५ लक्स
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सूर्यकिरणे अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत आली. महाद्वार रोडपासून प्रवास करीत ही किरणे ५ वाजून ४९ मिनिटांनी अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत येऊन लुप्त झाली. आज, शुक्रवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस असून, सूर्यकिरणांची तीव्रता चांगली राहिली तर किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अंबाबाईच्या किरणोत्सवाला बुधवार (दि. ९)पासून सुरुवात झाली. मात्र, लीप वर्ष असेल तेव्हा किरणोत्सव ८ नोव्हेंबरपासून सुरू होतो. त्यानुसार मंगळवारी (दि. ८) किरणे अंबाबाई मूर्तीच्या चरणांपर्यंत, तर बुधवारी कमरेपर्यंत आणि गुरुवारी गळ्यापर्यंत आली होती.
गुरुवारी संध्याकाळी ५ वाजून ५६ मिनिटांनी सूर्यास्त होता. ४ वाजून ४८ मिनिटांनी महाद्वार रोडपासून सुरू झालेला किरणांचा प्रवास ५
वाजून ४९ मिनिटांनी अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत येऊन पूर्ण झाला. त्यानंतर किरणांची तीव्रता कमी होऊन ती लुप्त झाली. यावेळी सूर्यकिरणांची तीव्रता १५ लक्स इतकी होती.
गुरुवारी सूर्यकिरणांची तीव्रता चांगली होती. आकाश स्वच्छ आणि निरभ्र होते. ही तीव्रता आज, शुक्रवारीदेखील अशीच राहिली तर किरणे अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्यावर पडून किरणोत्सव पूर्ण होऊ शकेल, अशी माहिती प्रा. मिलिंद कारंजकर यांनी दिली.
सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्यावर येण्यासाठी आणखी दोन मिनिटांचा कालावधी मिळणे गरजेचे आहे. सूर्यकिरणांची तीव्रता कमी असली तरी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होण्यासाठी किरणांच्या मार्गातील अडथळे काढणे गरजेचे आहे.
- प्रा. किशोर हिरासकर