केईएम रुग्णालयातील रुची नानावटी ‘आॅफिसर आॅफ द मंथ’
By admin | Published: January 7, 2017 02:03 AM2017-01-07T02:03:45+5:302017-01-07T02:03:45+5:30
वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने नवजात शिशूंवर वैद्यकीय उपचार करणे, ही अतिशय कठीण आणि जटिल अशी बाब मानली जाते.
मुंबई : वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने नवजात शिशूंवर वैद्यकीय उपचार करणे, ही अतिशय कठीण आणि जटिल अशी बाब मानली जाते. ही सेवा अधिक प्रभावी व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या केईएम रुग्णालयात नवजात शिशूंसाठीच्या अतिदक्षता कक्षाचे गेल्या वर्षी लोकार्पण करण्यात आले. या कक्षात अत्याधुनिक यंत्रसामग्री येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, आदी बाबतीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. रुची नानावटी यांची ‘जानेवारी - २०१७’साठी ‘आॅफिसर आॅफ द मंथ’ म्हणजेच ‘महिन्याचे मानकरी’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
४२ खाटांच्या या अतिदक्षता कक्षासाठी ‘माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड’ या संस्थेच्या ‘सीएसआर’ निधीतून ३ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. उत्कृष्ट आणि उल्लेखनीय काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच इतरांनाही सकारात्मक प्रेरणा मिळावी, यादृष्टीने आॅफिसर आॅफ द मंथ निवडून त्यांचा सन्मान करण्याची पद्धत जानेवारी - २०१६ पासून महापालिका प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आली. या परंपरेला या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. या परंपरेअंतर्गत या वेळी प्रथमच एका महिला अधिकाऱ्याचा ‘आॅफिसर आॅफ द मंथ’ या बहुमानाने सत्कार करण्यात आला आहे.
महापालिका मुख्यालयात आयोजित महापालिका अधिकाऱ्यांच्या मासिक बैठकीदरम्यान महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन केईएम रुग्णालयातील डॉ. रुची नानावटी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्यासह महापालिकेचे उपायुक्त, साहाय्यक आयुक्त व विभागप्रमुख आदी उपस्थित होते. केईएम रुग्णालयातील नवजात शिशू शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. रुची नानावटी यांचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिर, दादर येथे झाले आहे. त्यांचे वैद्यकीय शिक्षण मुंबई सेंट्रल परिसरातील महापालिकेच्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहे. याच महाविद्यालयातून त्यांनी बालरोग चिकित्सा या विषयात पदव्युत्तर पदवीदेखील संपादन केली आहे. (प्रतिनिधी)