महिला पीएसआयशी असभ्य वर्तन
By Admin | Published: February 24, 2016 03:52 AM2016-02-24T03:52:01+5:302016-02-24T03:52:01+5:30
मुंबईतील एका पोलीस हवालदाराने दारू पिऊन आपल्याच पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षकाशी असभ्य वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे आपल्याच वरिष्ठांशी हुज्जत घालणारे
जमीर काझी, मुंबई
मुंबईतील एका पोलीस हवालदाराने दारू पिऊन आपल्याच पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षकाशी असभ्य वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे आपल्याच वरिष्ठांशी हुज्जत घालणारे असले महाभाग शहरातील अन्य तरुणी, महिलांच्या सुरक्षेची काय दक्षता घेणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘आॅनड्युटी’ घडलेल्या या घटनेने खात्यातील बेशिस्त चव्हाट्यावर आली आहे. याबाबत संबंधित हवालदारावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नसला, तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी योग्य खबरदारीचे आदेश आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराची माहिती अशी एका महिला उपनिरीक्षकांची नाइट ड्युटी असल्याने, त्या सहकाऱ्यासमवेत मोबाइल क्रमांक ५, बीट क्र.२ मध्ये गस्तीवर होत्या. त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पटेल टीटी चौकी येथे त्या तपासणीसाठी गेल्या असताना, त्यांना तेथे हवालदार आव्हाड झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला उठवले असता, त्याने मद्यपान केल्याचे निदर्शनास आले. आव्हाडकडे विचारणा केल्यावर त्याने या महिला अधिकाऱ्याला उद्धटपणे उत्तरे दिली. ‘तुम्ही कोण मला विचारणार? मी काहीही करीन,’ असे तो असभ्यपणे बरळत राहिला. हा प्रकार हाताबाहेर जात असल्याचे पाहून पीएसआयने ही माहिती तातडीने पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली, तसेच त्याच्या कृत्याबाबतची ‘डायरी’त नोंद करण्यात आली. त्यानंतर आव्हाडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तो दारू प्यायलेला असल्याचे स्पष्ट झाले.
आव्हाडने महिला अधिकाऱ्याशी केलेल्या असभ्य वर्तनाची बातमी पोलीस वर्तुळात पसरली. त्यामुळे त्याच्यावर बेशिस्त व बेजबाबदार वर्तन केल्याने मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ च्या नियम ३ तरतुदीनुसार सेवेतून निलंबित करण्यात आले. आव्हाडला आता विभागीय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
पोलीस खात्यात असभ्य वर्तन व गैरशिस्त खपवून घेतली जाणार नाही. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी अधिकाऱ्यांना खबदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
-देवेन भारती, सहआयुक्त,
कायदा व सुव्यवस्था
पोलीस दलामध्ये असे प्रकार टाळण्यासाठी योग्य खबरदारीचे आदेश आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अधिकाऱ्यांना यापुढे अधिक खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.