‘रुद्र’ने न्यायालयात हजर व्हावे - सनातन
By admin | Published: September 25, 2015 03:02 AM2015-09-25T03:02:37+5:302015-09-25T03:02:37+5:30
मडगाव (गोवा) बॉम्बस्फोटातील संशयित रुद्र पाटील याने न्यायालयात हजर व्हावे. त्याच्या मागे वकिलांची फौज उभी करू
कोल्हापूर : मडगाव (गोवा) बॉम्बस्फोटातील संशयित रुद्र पाटील याने न्यायालयात हजर व्हावे. त्याच्या मागे वकिलांची फौज उभी करू, असे मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील व हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव पुनाळेकर यांनी गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
सनातन संस्था आणि हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीने या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. कॉ. पानसरे हत्याप्रकरणी अटकेतील संशयित समीर गायकवाड याच्या बाजूने अॅड. संजीव पुनाळेकर, अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी वकीलपत्र घेतले आहे. रुद्रगौडा पाटीलही सनातन संस्थेचा अर्धवेळ साधक होता; पण २०११पासून न्यायालयाने त्याला मडगाव बॉम्बस्फोटामध्ये ‘फरार’ घोषित केल्यापासून तो आमच्या संपर्कात नाही. पण या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे; तसेच दुसरा संशयित प्रवीण लिमकर हाही संपर्कात नाही. त्या दोघांचा संपर्क झाल्यास त्यांना न्यायालयापुढे हजर राहण्याचा मी निश्चितच सल्ला देईन, असेही अॅड. पुनाळेकर यांनी सांगितले.
माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ धार्मिक दहशतवाद पसरवीत असल्याने त्यांची जागा तुरुंगातच आहे. त्यामुळे ते सनातन संस्थेच्या मागे लागल्यास आम्हीही गप्प बसणार नाही. त्यांच्यावरही दहशतवादाचा गुन्हा नोंदवून त्यांना धडा शिकवणार आहोत, असेही ते म्हणाले.
श्याम मानव यांच्या संस्थेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
२ कोटी रुपये दिले आहेत. त्या पैशांवर ते देशभर दौरे करीत आहेत; तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांची सर्वांत जास्त बदनामी त्यांनीच केल्याने त्यांना दिलेले पैसे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून परत घ्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)
...तर हेमंत करकरेंना जन्मठेप!
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दिवंगत पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा दृश्य हात होता, असा आरोप करून ते म्हणाले, करकरे यांनी एका संशयिताला अटक न करताच त्याला खासगी विमानाने तपासासाठी फिरविले. त्याची ब्रेन मॅपिंग तपासणी केली. त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. आज करकरे जिवंत असते तर ते जन्मठेपेच्या कारवाईस पात्र होते.
आव्हाड यांनी ‘आदर्श’ इतिहास तपासावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे ‘सनातन’वर बंदी आणण्याची मागणी वारंवार करत आहेत. ‘सनातन’ची त्यांना अनेक प्रकरणे आठवत असतील तर मुंबईत ‘आदर्श’ सोसायटीप्रकरणी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांना आपल्या ‘फ्लॅट’चा उल्लेख करण्याचा का विसर पडला? याबाबतचा त्यांचा ढोंगीपणा आपण बाहेर काढू, असे अॅड. पुनाळेकर म्हणाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी महाराष्ट्रात अनेक घोटाळे केले आहेत. त्यांनी शासनाचे २ कोटी रुपये बुडविले असून, त्यापासून बहुजनांचे लक्ष विचलित करण्यासाठी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी ते वारंवार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.