रेशन दुकानातून तूरडाळ मिळणार!
By Admin | Published: November 26, 2015 02:40 AM2015-11-26T02:40:09+5:302015-11-26T02:40:09+5:30
व्यापाऱ्यांनी केलेली साठेबाजी, तूरडाळीची होत असलेली भाववाढ रोखण्यासाठी शिधापत्रिकेवर तूरडाळ देण्याचा प्रस्ताव अन्न व पुरवठा विभागाचे मंत्री गिरीष बापट यांनी तयार केला
अतुल कुलकर्णी, मुंबई
व्यापाऱ्यांनी केलेली साठेबाजी, तूरडाळीची होत असलेली भाववाढ रोखण्यासाठी शिधापत्रिकेवर तूरडाळ देण्याचा प्रस्ताव अन्न व पुरवठा विभागाचे मंत्री गिरीष बापट यांनी तयार केला असून त्यावर पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची श्क्यता आहे.
राज्यातील अंत्योदय आणि बीपीएल योजनेतील कार्डधारकांना प्रतीशिधापत्रिका दरमहा १ किलो तूरदाळ देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती अन्न व पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत सादर केली. अंत्योदय अन्न योजनेत २४ लाख ७२ हजार ७५३ , बीपीएल योजनेत ४५ लाख ३४ लाख ८३६, तर एपीएल (केशरी) मध्ये १ कोटी ४६ लाख ४५ हजार ०२३ असे एकूण २ कोटी १६ लाख ५२ हजार ६१२ शिधापत्रिका धारक आहेत. प्रतीशिधापत्रिका प्रतिमाह १ किलो तूरडाळ दिली तर शासनास दरमहा २१,६५३ मे. टन म्हणजेच वर्षाला २,५९,८३६ मे. टन तूरडाळीची आवश्यकता लागणार आहे. तूरडाळीचा घाऊक बाजारातील दर १२५ रु. प्रतीकिलो गृहित धरला तर दरमहा २७०.६६ कोटी रुपये खरेदीसाठी व अनुषंगिक बाबींसाठीचा खर्च म्हणून ३.२५ कोटी रुपये ,असे एकूण २७३.९१ कोटी रुपये दरमहा शासनास लागणार आहेत.