मतमोजणीसाठी कडेकोट
By Admin | Published: May 15, 2014 04:55 AM2014-05-15T04:55:29+5:302014-05-15T04:55:29+5:30
शुक्रवारी कोरेगाव पार्क येथील भारतीय वखार महामंडळ व बालेवाडी येथे होणार्या मतमोजणीसाठी गुरुवारी रात्री अकरापासूनच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे
पुणे : शुक्रवारी कोरेगाव पार्क येथील भारतीय वखार महामंडळ व बालेवाडी येथे होणार्या मतमोजणीसाठी गुरुवारी रात्री अकरापासूनच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या दिवशी शहरामध्ये केंद्रीय व राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार असून, त्यांच्या मदतीला विशेष शाखा, क्यूआरटी यांच्यासोबत ५०० कर्मचारी असतील. तर, बालेवाडी येथे ३०० कर्मचारी बंदोबस्तामध्ये तैनात असल्याची माहिती विशेष शाखेचे उपायुक्त प्रदीप देशपांडे यांनी दिली. बालेवाडी स्टेडियममध्ये मतमोजणी होणार असल्यामुळे तेथे वाहतुकीवर ताण येणार नसला, तरीदेखील कोरेगाव पार्क येथील रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याचे वाहतूक उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. नॉर्थ मेन रस्त्याकडून वखार महामंडळाकडे सात गल्ल्यांपैकी पहिल्या गल्लीमधून वाहतूक आणि पार्किंग सुरू राहील. उर्वरित पाच गल्ल्यांमधील वाहतून अर्ध्यापर्यंतच सुरू ठेवण्यात येणार आहे. पुढच्या भागामध्ये वाहतूक आणि पार्किंगला बंदी करण्यात आली आहे. संत गाडगेमहाराज शाळेशेजारी राहणारे नागरिक साई मंदिराकडून गोदामाकडे जाऊ शकणार नाहीत. ते साई मंदिरापासून साऊथ मेन रोड मार्गे जाऊ शकतील. नाला गार्डन जंक्शन ते साऊथ मेन रोड येथील २ आणि ३ क्रमांकाच्या गल्ल्या बंद करण्यात येणार आहेत. वाहतुकीतील हा बदल गुरुवारी रात्री अकरापासून अमलात येणार आहे. स्थानिक नागरिकांनी त्यांची वाहने काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)