नवरात्रोत्सवात पंढरपूरच्या रुक्मिणीमातेला सोन्याच्या साडीचा पोशाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 05:29 PM2019-09-29T17:29:54+5:302019-09-29T17:34:19+5:30
पाच दिवस मंदिरात फुलांची आरास; पाचव्या माळेला रूक्मिणीमातेस असेल फुलांचा पोशाख, दिवा लावून श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सवास प्रारंभ
पंढरपूर : श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवात १० पैकी ५ दिवस मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात येणार आहे. शिवाय रूक्मिणी मातेस चौथ्या माळेला (२ आॅक्टोबर) फुलांची साडी तर दसºयादिवशी (८ आॅक्टोबर) सोन्याच्या साडीचा पोषाख असणार आहे.
नवरात्र महोत्सवात पहिल्या दिवशी (दि. २९) रूक्मिणी मातेस केशरी, ३० रोजी लमानी पोषाख, १ आॅक्टोबरला लाल, २ रोजी फुलांची साडी, ३ रोजी पिवळ्या रंगाची, ४ रोजी हिरवा रंगाची, ५ रोजी करड्या रंगाची साडी, ६ रोजी पांढºया रंगाची साडी, ७ रोजी मोरपंखी तर दहाव्या दिवशी ८ रोजी रूक्मिणी मातेस सोन्याच्या साडीचा पोषाख असेल, अशी माहिती प्रभारी कार्यकारी अधिकारी गजानन गुरव व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
घटस्थापनेपासून १० दिवस रूक्मिणी मातेस पवमान अभिषेक करण्यात येणार आहे. रविवारी दिवा लावून श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिरात नवरात्र महोत्सवास प्रारंभ होईल.
नवरात्र काळात रूक्मिणी स्वयंवर कथा, रूक्मिणी स्वयंवर सामुदायिक ग्रंथ पारायण, भजनी मंडळांची भजने, गोंधळ आदीसह श्री विठ्ठल सभामंडपात किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. संत तुकाराम भवन येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यासाठी तयारी केली असून, रसिक श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.