‘नियमानुसार काम’ आंदोलनाचा इशारा
By Admin | Published: January 31, 2017 02:27 AM2017-01-31T02:27:49+5:302017-01-31T02:27:49+5:30
मध्य रेल्वे प्रवाशांना तांत्रिक बिघाडांचा सामना करावा लागत असतानाच मोटरमन, गार्ड आणि रेल्वे प्रशासनातील अंतर्गत वादाचा सामना प्रवाशांनाही करावा लागणार आहे. कामाच्या वेळा ठरवण्यासाठी
मुंबई : मध्य रेल्वे प्रवाशांना तांत्रिक बिघाडांचा सामना करावा लागत असतानाच मोटरमन, गार्ड आणि रेल्वे प्रशासनातील अंतर्गत वादाचा सामना प्रवाशांनाही करावा लागणार आहे. कामाच्या वेळा ठरवण्यासाठी नेमण्यात आलेली समिती रेल्वेकडून रद्द करण्यात आल्याने त्याचा निषेध म्हणून १ फेब्रुवारी रोजी मोटरमन आणि गार्डकडून नियमानुसार काम आंदोलन करण्याचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
लोकलचे मोटरमन आणि गार्ड यांच्या कामाच्या वेळा ठरवण्यासाठी एक समिती असते. या समितीमध्ये मोटरमन व गार्ड यांच्यापैकी प्रत्येकी दोन असे मिळून चार सदस्य असतात. त्यासाठी अंतर्गत निवडणुका होऊन सदस्यांची निवड केली जाते. मात्र या निवडणुका रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्या आहेत. हा निर्णय कामगारांसाठी घातक असल्याची टीका रेल्वे कामगार सेना, एससी-एसटी रेल्वे कामगार संघटनांसह विविध संघटनांनी केला आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून सोमवारी मोटरमन आणि गार्डकडून काळ्या फिती लावून काम करण्यात आले.
मात्र याबाबत योग्य निर्णय घेतला नाही, तर १ फेब्रुवारी रोजी नियमानुसार काम आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मोटरमन आणि गार्डकडून ठरलेल्या वेळेपेक्षाही जादा काम केले जाते. मात्र हे काम न करता नियमानुसार काम केल्यास त्याचा परिणाम लोकल सेवेवर होण्याची शक्यता आहे. सध्या जादा लोकल फेऱ्या आणि अन्य कामे पाहता मोटरमन व गार्डवर कामाचा ताण पडतो. नियमानुसार काम केल्यास त्याचा फटका लोकल सेवेला बसू शकतो. (प्रतिनिधी)