नियम बसविले धाब्यावर

By admin | Published: June 11, 2016 01:42 AM2016-06-11T01:42:07+5:302016-06-11T01:42:07+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड, संभाजीनगर येथील साई उद्यानात बेकायदारीत्या तीन मजली इमारत उभी राहिली आहे.

Rule was fixed | नियम बसविले धाब्यावर

नियम बसविले धाब्यावर

Next


पिंपरी : बांधकाम परवानगी नसतानाही केवळ राजकीय दबावामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड, संभाजीनगर येथील साई उद्यानात बेकायदारीत्या तीन मजली इमारत उभी राहिली आहे. सामान्य नागरिकांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत असताना महापालिकेने उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संभाजीनगरातील या उद्यानात १० बाय १५ मीटर इतक्या जागेत ही बेकायदा इमारत उभी राहिली असून, त्यामध्ये व्यायामशाळा, संगणक प्रशिक्षण केंद्र आणि वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. शहरात विनापरवानगी अनधिकृत बांधकाम केल्यास त्यावर कारवाई केली जात आहे. बहुमजली इमारती जमीनदोस्त केल्या जात आहेत. या कारवाईसाठी पोलीस बळाचाही वापर करण्यात आला. एकीकडे सामान्य नागरिकांसाठी नियमावली दाखविली जात असताना हीच नियमावली महापालिकेकडून पायदळी तुडविली जात आहे.
शहरात उभी राहणारी अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी महापालिकेने बीट निरीक्षक नेमले आहेत. अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्यावर कारवाई केली जात आहे. मात्र, संभाजीनगरातील उद्यानात अनेक दिवसांपासून तीन मजली बांधकाम राजरोसपणे सुरू आहे. त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. या उद्यानाची जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ची आहे. त्यामुळे या जागेवर बांधकाम करण्यासाठी एमआयडीसीची परवानगी आवश्यक आहे. बांधकाम परवानगीसाठी एमआयडीसीकडे फाइल दिली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. परवानगी मिळाली नसतानाही तब्बल तीन मजली इमारत उभी राहिली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातील एका पदाधिकाऱ्याच्या हट्टापायी हे बेकायदा बांधकाम सुरू असल्याचे बोलले जात आहे. नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. (प्रतिनिधी)
>कार्यकारी अभियंता : एमआयडीसीकडे अर्ज
संभाजीनगर येथील उद्यानात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी परवानगी मिळावी, यासाठी एमआयडीसीकडे अर्ज दिला आहे. मात्र, अद्याप परवानगी मिळालेली नाही, असे कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांनी सांगितले. दरम्यान, सामान्य नागरिकांनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होत असताना महापालिकेकडून उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Rule was fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.