राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला झुलवत ठेवले- हेमंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 05:08 AM2018-08-25T05:08:35+5:302018-08-25T05:09:02+5:30
२९ आॅगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या भाजपा सरकारविरोधातील आक्रोश मोर्चावर आपण ठाम असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.
मुंबई : सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये जातीचे दाखले मिळू नयेत म्हणून झुलवत ठेवल्याचा आरोप याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २९ आॅगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या भाजपा सरकारविरोधातील आक्रोश मोर्चावरही आपण ठाम असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.
ते म्हणाले, धनगर आरक्षणाच्या नावाखाली प्रत्येक पक्षाने आपली वोटबँक भरून सत्तेचा उपभोग घेतला. धनगर समाजाला कुठलाही पक्ष नको असून, एसटीमध्ये जातीचे दाखले हवे आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात धनगर बांधव रस्त्यावर उतरून राग व्यक्त करत आहे. तरीही भाजपा सरकारला जाग येत नाही. राज्य सरकारने टिसचा अहवाल मागवून घेतला नाही, म्हणूनच धनगर समाजाला २९ आॅगस्ट रोजी आझाद मैदानावर ‘भाजपा सरकार चले जाव’ असा आक्रोश मोर्चा काढावा लागत आहे. या मोर्चात एक ते दीड लाख धनगर समाज उपस्थित राहण्याचा दावाही पाटील यांनी केला आहे.
मोर्चादरम्यान चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. काही भाजपाची नेते मंडळी धनगर आंदोलनात फूट पाडण्यासाठी वेगळ्या मोर्चाची चूल मांडून शक्तिप्रदर्शन करीत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. या वेळी जनहित संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षा सायली शिंदे, विक्रम भोसले, राजेश पालवे, समाधान बचिरे हे समन्वयक उपस्थित होते.
२७ आॅगस्टला बैठक
मुंबई : धनगर आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध संघटनांची बैठक २७ आॅगस्टला सह्याद्री अतिथीगृहावर बोलविली आहे.
सध्या धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाच्या सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठीचे काम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) देण्यात आले आहे.
टीसीएसचे अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १५ दिवसांत हा अहवाल सरकारला सादर होण्याची शक्यता आहे.