चालकांकडून नियमांची पायमल्ली
By Admin | Published: April 7, 2017 02:27 AM2017-04-07T02:27:03+5:302017-04-07T02:27:03+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश करण्यापूर्वी येथील उड्डाणपुलाजवळ खासगी वाहन चालकांकडून अनधिकृत बस थांबा तयार करण्यात आला
पनवेल : कळंबोलीजवळ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश करण्यापूर्वी येथील उड्डाणपुलाजवळ खासगी वाहन चालकांकडून अनधिकृत बस थांबा तयार करण्यात आला आहे. याठिकाणी सर्रास वाहतूक नियमांची पायमल्ली होत आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांकडून वारंवार समज देऊन, तसेच दंडात्मक कारवाई करून देखील याठिकाणी मोठ्या संख्येने खासगी वाहने थांबविली जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे .
पनवेलसह मुंबईकडून येणारी वाहने पुण्याच्या दिशेने जाणारी अनेक खासगी वाहने थांबवली जातात. अनेक वेळा बसची वाट बघण्यापेक्षा प्रवासीही खासगी वाहनांना थांबवून प्रवास करतात. विशेष म्हणजे या उड्डाणपुलाजवळ थांबू नये म्हणून कळंबोली वाहतूक शाखेच्या वतीने मोठा फलक देखील लावण्यात आला आहे. तरी देखील त्याला न जुमानता खासगी वाहन चालक याठिकाणी थांबून जणू पोलिसांनाच आव्हान देत असतात. दररोज अनेक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून देखील याठिकाणी थांबणाऱ्या वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे घातक आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या दिशेने येणारी वाहने ही अतिशय तीव्र वेगाने पुढे जात असतात. याठिकाणी कोणताही थांबा नसल्याने वाहन चालक सुसाट याठिकाणाहून वाहन चालवत असतात. त्यामुळे थांबलेली वाहने, प्रवासी यांचा अंदाज न लागल्याने अनेक वेळा ही वाहने याठिकाणच्या गाड्यांना धडकल्याच्या घटना देखील वारंवार घडत आहेत. कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोरख पाटील यांच्या मते आम्ही याठिकाणी दररोज एक वाहतूक पोलीस याठिकाणी थांबणाऱ्या प्रवाशांना सूचना देण्यासाठी ठेवला आहे. तरी देखील काही क्षणासाठी जरी वाहतूक पोलीस याठिकाणाहून बाजूला झाल्यास अनेक जण वाहतूक नियम मोडत असताना नजरेत पडतात. हे प्रवाशांच्या दृष्टीने धोकादायक आहे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मुंबईच्या दिशेने येणारी अनेक वाहने लाँग ड्राइव्हसाठी याठिकाणाहून जात असतात. या परिसरात असलेल्या मॅकडोनाल्डमधून खाद्यपदार्थ घेण्यासाठी देखील अनेक वाहने रस्त्यावर सर्रास थांबतात. त्यामुळे देखील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)
स्वस्तात प्रवासासाठी जीव धोक्यात
पुण्याच्या दिशेने जाणारी शेकडो वाहने या मार्गावरून जात असतात. या वाहनात प्रवास करण्यासाठी बस किंवा व्होल्वोच्या दृष्टीने कमी पैसे खर्च होतात. त्यामुळे अनेक प्रवासी आपला जीव मुठीत धरून या अनधिकृत बस थांब्यावर थांबून या वाहनांना थांबवत असतात. या गाड्यांवरील वाहन चालक देखील थोडेफार पैसे मिळविण्यासाठी आपल्या गाड्या थांबवून याठिकाणाहून प्रवासी वाहतूक करीत असतात. अनेक वेळा या खासगी वाहनातून प्रवाशांचे अपहरण देखील करण्यात आले आहे.
याठिकाणी दररोज एक वाहतूक पोलीस याठिकाणी थांबणाऱ्या प्रवाशांना सूचना देण्यासाठी ठेवला आहे. तरी देखील काही क्षणासाठी जरी वाहतूक पोलीस याठिकाणाहून बाजूला झाल्यास अनेक जण वाहतूक नियम मोडत असताना नजरेत पडतात. हे प्रवाशांच्या दृष्टीने धोकादायक आहे हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
- गोरख पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळंबोली वाहतूक शाखा