नियम तुडवीत भूदानातील जमिनीची विक्री, हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2015 04:01 AM2015-05-18T04:01:11+5:302015-05-18T04:01:11+5:30

भूमिहिनांना जमिनी मिळाव्या म्हणून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबविली़ यात लाखो हेक्टर जमिनी विनोबांना दानात मिळाल्या

Rules for sale of land in transit land, transfer | नियम तुडवीत भूदानातील जमिनीची विक्री, हस्तांतरण

नियम तुडवीत भूदानातील जमिनीची विक्री, हस्तांतरण

Next

प्रशांत हेलोंडे, वर्धा
भूमिहिनांना जमिनी मिळाव्या म्हणून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबविली़ यात लाखो हेक्टर जमिनी विनोबांना दानात मिळाल्या; पण या जमिनीच्या वाटपात मोठा घोळ आहे़ जिल्ह्यातील सुमारे २ हजार हेक्टर जमिनीच्या वाटपात निकषांना तिलांजली देत मनमानी वाटप केल्याचे उघड झाले़ भूदानातील जमिनीचे हस्तांतरण, विक्री होत नाही; पण नियम तुडवीत वर्धा जिल्ह्यात सररास जमिनीची विक्री करण्यात आल्याचेही माहिती अधिकारात प्राप्त सातबारा प्रमाणपत्रांतून निदर्शनास येते़
केंद्र शासन पुरस्कृत आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान यज्ञात जिल्ह्यात १९८०़४९ हेक्टर आर जमीन प्राप्त झाली़ यातील १८६१़९४ हेक्टर आर जमिनीचे वाटप केले़ आता जिल्ह्यात भूदानातील केवळ ११८़५५ हेक्टर आर जमीन शिल्लक आहे़ या जमिनीवरही भूखंडमाफियांची काकदृष्टी आहे़ वर्धा तालुक्यात सर्वाधिक ३५५़१४ हे़आऱ जमीन प्राप्त झाली व ३३७़१ हे़आऱ वितरित करण्यात आली़ तालुक्यात भूदानाची केवळ १८़०४ हे़आऱ जमीन शिल्लक आहे़ वर्धा तालुक्यात वर्धा, सेवाग्राम, वायगाव (नि़), तळेगाव (टा़), आंजी (मोठी) आणि वायफड अशी सहा मंडळे आहेत. या सहा मंडळांमध्ये भूदानात प्राप्त जमिनीचे वाटप अल्पभूधारक, भूमिहीन, निवृत्त सैनिक यांना होणे क्रमप्रात होते; पण तसे झाले नाही़ बहुतांश जमिनी संस्थानिक, ले-आउटधारकांच्या घशात घातल्याचेच दिसते़
वर्धा मंडळात ४० सर्व्हे क्रमांकातील ४८़२७ हे़आऱ जमीनवाटप करण्यात आली़ यातील एका ३़४७ हेक्टर आर जमिनीवर तीन बँकांनी तब्बल ९८़२९ कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची नोंद सातबाऱ्यामध्ये करण्यात आली आहे़ ही जमीन भूदानधारकाने हक्क सोडल्यावर एका संस्थेला हस्तांतरित झाल्याचे नमूद करण्यात आले आहे़
वास्तविक, भूदानात वितरित जमिनीचा व्यावसायिक वापर करता येत नाही; पण सदर जमिनीचा गत कित्येक वर्षांपासून व्यावसायिक वापर होत आहे़
असाच प्रकार तालुक्यातील भूदानात प्राप्त अन्य जमिनींबाबतही झाला आहे़ सेवाग्राम मंडळात ५२़९१ हे़आऱ जमिनीचे वाटप केले़
वायगाव मंडळात २२़९२ हे़आर., तळेगाव (टा़) मंडळात ६०़२५ हे़ आऱ, आंजी (मोठी)मध्ये सुमारे ५० हे़आर. तर वायफड मंडळात सर्वाधिक १०३ हे़आऱ जमिनीचे वाटप करण्यात आले़ यातील बहुतांश जमिनींवर ले-आउट विकसित झाल्याचे चित्र आहे़

Web Title: Rules for sale of land in transit land, transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.