रुळांची सुरक्षा विशेष पथकांकडे

By Admin | Published: March 3, 2017 06:01 AM2017-03-03T06:01:56+5:302017-03-03T06:01:56+5:30

दिवा आणि त्यानंतर नवी मुंबई स्थानकांजवळ लोखंडी तुकडे तसेच स्फोटके ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

Rules for security of special teams | रुळांची सुरक्षा विशेष पथकांकडे

रुळांची सुरक्षा विशेष पथकांकडे

googlenewsNext


मुंबई : दिवा आणि त्यानंतर नवी मुंबई स्थानकांजवळ लोखंडी तुकडे तसेच स्फोटके ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून लोहमार्ग पोलिसांकडून मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई व ठाणे भागात १९ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. रात्री व मध्यरात्री या पथकांकडून गस्त घालण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
जानेवारी २0१७ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर दिवा ते पारसिक बोगद्यादरम्यान सात मीटर लांबीच्या रुळाचा तुकडा आढळला होता. ही बाब जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चालकाच्या निदर्शनास आली आणि ट्रेन थांबवल्यानंतर मोठी दुर्घटना टळली. हा घातपाचा प्रकार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर घटनेची गंभीर दखल घेत लोहमार्ग पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा, राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयएकडून) तपास करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच लागोपाठ आणखी एक घटना घडली. नवी मुंबईतील एका रेल्वे स्थानकाजवळ स्फोटके आढळली. या दोन्ही घटनांनंतर लोहमार्ग पोलिसांकडून मध्य रेल्वे मार्गावर सुरक्षेचे उपाय योजण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी १९ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. ठाणे ते दिवा-पनवेल आणि ठाणे ते कल्याण व ठाणे ते घाटकोपर दरम्यान ही पथके तैनात असल्याचे सांगण्यात आले. या प्रत्येक पथकात पाच शस्त्रधारी पोलीस आहेत. सायंकाळी सात ते सकाळी सहापर्यंत पथके तैनात असतील आणि रात्रीच्या वेळी ट्रॅकवर गस्त घालतील. लोहमार्ग पोलिसांकडे जरी मनुष्यबळ कमी असले तरी जवळच्याच पोलीस ठाण्यातील कर्मचारीही मदतीसाठी घेतले जात आहेत. पश्चिम रेल्वेवरही गोरेगाव ते पालघर दरम्यान विशेष तुकडी तैनात करण्यात आली होती.
>‘आरपीएफ’चेही विशेष कृती दल
आरपीएफकडूनही विशेष कृती दल स्थापन करण्यात आले आहे. ते तळोजा व दिवा स्थानकाच्या आसपासच्या परिसरात लक्ष ठेवतील.

Web Title: Rules for security of special teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.