सत्ताधारीच आमने-सामने

By Admin | Published: October 19, 2016 04:22 AM2016-10-19T04:22:04+5:302016-10-19T04:22:04+5:30

आश्वासन कागदावरच राहिल्याचा आरोप करीत लवकरच एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा पवित्रा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी घेतला

The ruling face-to-face | सत्ताधारीच आमने-सामने

सत्ताधारीच आमने-सामने

googlenewsNext


कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांसाठी अतिरिक्त पाण्याचा कोटा देण्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन कागदावरच राहिल्याचा आरोप करीत लवकरच एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा पवित्रा कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी घेतला आहे. अतिरिक्त कोट्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना शिवसेनेने घेतलेली भूमिका म्हणजे एक प्रकारे श्रेय लाटण्याचा प्रकार असल्याचा टोला भाजपाने लगावला आहे. यामुळे रस्ते विकासासह अतिरिक्त पाण्याच्या कोट्यावरूनही केडीएमसीतील हे सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
२७ गावांना एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात पाण्याअभावी लागू झालेल्या पाणीकपातीत १७ ते १८ दशलक्ष लीटर पाणी ग्रामीण भागाला मिळत होते. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडूनही आजघडीला पिण्याच्या पाण्याची कमतरता २७ गावांमध्ये भेडसावत आहे. महिनाभरापूर्वी ग्रामीण भागातील भाजपाच्या नगरसेवकांनी जलसंपदामंत्र्यांची भेट घेऊन अतिरिक्त ३० दशलक्ष लीटर पाणी द्यावे, अशी मागणी केली होती. यावर, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती प्रतिदिन वाढीव १७ दशलक्ष लीटर पाणी देऊ, या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. परंतु, जलसंपदामंत्र्यांनी आदेश देऊन एक महिना उलटला तरी याची अंमलबजावणी झालेली नाही, याकडे भोईर यांनी लक्ष वेधले आहे. जो कोटा होता, त्यातही कपात केल्याने पाणीटंचाईची भीषण परिस्थिती गावांमध्ये उद्भवली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
यांसदर्भात खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही पत्रव्यवहार करून अतिरिक्त पाण्याच्या कोट्याकडे लक्ष वेधल्याचे भोईर यांनी सांगितले. परंतु, याची अंमलबजावणी न झाल्याने एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे ते म्हणाले. बारवी धरणाची उंची वाढल्याने दीडपट पाणी वाढले, त्याचे काय झाले, असा सवालही भोईरांनी केला आहे.
>सेना शिष्टमंडळ जलसंपदा मंत्र्यांच्या भेटीला
एकीकडे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी अपुऱ्या पाणी कोटयासंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला असताना मंगळवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २७ गावांसाठी अतिरीक्त २० दशलक्ष लिटर पाणी द्यावे अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना केली. यावर महाजन यांनी २० दशलक्ष लिटर पाणी उचलण्याचे आदेश एमआयडीसीला दिले असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. शिष्टमंडळात महापौर देवळेकरांसह सभागृहनेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण ग्रामीणचे प्रकाश म्हात्रे, सुखदेव पाटील, एकनाथ पाटील उपस्थित होते. महाजन यांच्या निर्णयामुळे २७ गावांना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध होणार असल्याचे देवळेकर म्हणाले.

Web Title: The ruling face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.