सत्तारूढ-विरोधक एकमेकांना भिडणार! विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 05:47 AM2022-03-03T05:47:14+5:302022-03-03T05:48:21+5:30
राज्यातील ‘राजकीय बदला’ घेण्याच्या राजकारणाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात उमटतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील ‘राजकीय बदला’ घेण्याच्या राजकारणाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उमटतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत विरोधकांचे हल्ले तितक्याच जोरकसपणे परतवून लावण्याचा निर्धार करण्यात आला. त्याचवेळी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासह विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकत संघर्षाची नांदी दिली. स्वत: मुख्यमंत्री या चहापानाला उपस्थित नव्हते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह बहुतेक सर्व मंत्री हजर होते.
एरवी सभागृहातील आरोप-प्रत्यारोपांचे पडसाद राज्यात उमटतात. मात्र, यावेळी अधिवेशनापूर्वीच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष शिगेला पोहोचला असताना बाहेरचे राजकीय वादळ दोन्ही सभागृहांमध्ये घोंगावणार अशी चिन्हे आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होईल. विधानसभा अध्यक्षांची निवड ९ मार्चला होण्याची शक्यता आहे.