रम्मी हा जुगार आहे का?

By admin | Published: August 27, 2014 04:28 AM2014-08-27T04:28:02+5:302014-08-27T04:28:02+5:30

चार टाळकी एकत्र जमली की घरी किंवा क्लबमध्ये सररास खेळला जाणारा रम्मी हा पत्त्यांचा खेळ जुगार आहे की कौशल्याचा खेळ आहे

Is Rummy Gambling? | रम्मी हा जुगार आहे का?

रम्मी हा जुगार आहे का?

Next

मुंबई : चार टाळकी एकत्र जमली की घरी किंवा क्लबमध्ये सररास खेळला जाणारा रम्मी हा पत्त्यांचा खेळ जुगार आहे की कौशल्याचा खेळ आहे हा कळीचा मुद्दा पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला असून, देशभरातील पत्तेबहाद्दर व त्यांना जुगारी मानून त्रास देणारे पोलीस न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत.
रम्मीचे फड जमवून मुंबईच्या लोकल गाडीचा एरवी खडतर असलेला प्रवास गेल्या दोन पिढ्यांनी आपल्यापुरता सुसह्य केला. परंतु रेल्वे पोलिसांनी धाडी घालून हा प्रवासी ‘जुगार’ बंद केला. त्यानंतर भजनी मंडळींना जोर आला, पण आता तोही ओसरला. रस्तोरस्ती आणि गल्लीबोळांत पडणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडपाच्या मागे पत्त्यांचे रिंगण बसणे आणि कारवाईसाठी नाही, तरी चिरीमिरीच्या आशेने पोलिसांनी तेथे चक्कर मारणे हेही नेहमीचेच अनुभव. अशा या सदाबहार आणि सर्वव्यापी रम्मीचा फैसला सर्वोच्च न्यायालय कधी व काय करते याकडे चोखंदळांचे लक्ष लागले आहे. खरेतर, रम्मी हा एक कौशल्याचा खेळ आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानेच १९६८मध्ये एकदा दिलेला आहे. पुन्हा ३० वर्षांनी कौशल्याच्या खेळांना जुगार प्रतिबंधक कायदा लागू होत नाही, असा निकाल देत न्यायालयाने रम्मीला जुगाराच्या कक्षेतून बाहेर काढले. असे असूनही मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाविरुद्धच्या अपिलाच्या निमित्ताने हा विषय पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयापुढे आला आहे. मद्रास उच्च न्यायालयातील प्रकरण रम्मी क्लबविरुद्धचे होते. विरंगुळ्यासाठी चालविल्या जाणाऱ्या क्लबमध्ये पैसे लावून रम्मी खेळता येणार नाही आणि तसे केले तर तो जुगार ठरेल व क्लबना परवाना घ्यावा लागेल, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Is Rummy Gambling?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.