अफवांचा टायर ब्लास्ट
By admin | Published: September 30, 2014 12:33 AM2014-09-30T00:33:04+5:302014-09-30T00:33:04+5:30
निवडणुकीच्या बैठकीला येण्यास नकार दिल्यामुळे कुख्यात गुंडाने दोन तरुणांवर जोरदार हल्ला चढवला. मारहाणीची ही घटना सुरू असतानाच एका दुचाकीचे टायर फुटल्यामुळे फायरिंग झाल्याची
निवडणुकीच्या बैठकीला येण्यास नकार : गुंडांकडून मारहाण
नागपूर : निवडणुकीच्या बैठकीला येण्यास नकार दिल्यामुळे कुख्यात गुंडाने दोन तरुणांवर जोरदार हल्ला चढवला. मारहाणीची ही घटना सुरू असतानाच एका दुचाकीचे टायर फुटल्यामुळे फायरिंग झाल्याची जोरदार अफवा पसरली. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत ‘त्या’ गुंडाची धुलाई करीतच त्याला आज अटक केली.
ताजाबादमधील आजाद कॉलनीत शेख साजिद या तरुणाचे सायकल स्टोर्स आहे. रविवारी रात्री दुकान बंद करून तो शाहबाज नामक भावासोबत आपल्या घरी जात होता. कुख्यात पापा, सलमान, शाहरूख आणि अन्य एक अशा चौघांनी साजिदला रोखले. ‘भाई के घर नेताकी मिटिंग है चलना पडेगा’ असे म्हणत त्याला अक्षरश: खेचतच तेथून बैठकीच्या स्थळी नेण्याचे प्रयत्न झाले. साजिद आणि शाहबाजने नकार देताच पापा आणि त्याच्या दोन साथीदारांनी साजिद व शाहबाजला बेदम मारहाण केली. या घटनेने परिसरात तणाव निर्माण केला. घटनास्थळी मोठी गर्दी जमली असतानाच एका दुचाकीचे टायर फुटले. त्यामुळे घटनास्थळी गोळीबार झाल्याची अफवा काहींनी पसरवली. रात्री ११.३० ला या घटनेची सक्करदरा ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांनी गुन्हे दाखल करून प्रकरण चौकशीत घेतले.(प्रतिनिधी)
तडीपार पापाची दहशत
पापा या कुख्यात गुंडाची परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याला यापूर्वीही तडिपार करण्यात आले होते. मात्र, तो याच भागात फिरतो. सक्करदरा ठाण्यातील काही जणासोबत पापाची मैत्री आहे. त्यामुळे पापाविरुद्ध कुणी शब्द काढत नाही. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांनी या घटनेची गंभीर नोंद घेतली. त्यांनी स्वत:च आज दुपारी पीडित साजिदचे घर गाठले. त्याला घटनेबाबत विचारणा केली. नंतर परिसरातील नागरिकांकडून या घटनेची माहिती जाणून घेतली. गोळीबाराचा सर्वांनीच इन्कार केल्याचे डीसीपी सिंधू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नेत्यांनी पोसलेले गुंड सक्रिय
कुख्यात पापाला त्याच्या साथीदारांसह तासाभरात हुडकून काढण्याचे आदेश डीसीपी सिंधू यांनी पोलिसांना दिले. त्यामुळे पोलीस सक्रिय झाले. एका घरात दडून बसलेल्या पापाला पोलिसांनी बदडतच बाहेर काढले. त्याच्या एका साथीदाराच्या पत्नीची प्रकृती खराब असल्याने त्याने रात्री ठाण्यात येतो, असे सांगून आपली मानगुट सोडवली. तिसरा फरार असून, चौथ्याने मारहाण केली नाही, तर आपल्याला पापाच्या तावडीतून सोडवल्याचे साजिदने पोलिसांना सांगितले. निवडणुका जाहीर होताच नेत्यांनी पोसलेले गुंड सक्रिय झाल्याचे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.