शहीद राणेंच्या घरी अक्षयने भेट दिल्याची अफवा, सोशल मीडियावर खोटा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 01:51 AM2018-08-16T01:51:20+5:302018-08-16T01:51:35+5:30
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या घरी पहाटे ३ वाजता अभिनेता अक्षयकुमार येऊन गेला. त्याने कुटुंबाला नऊ लाखांचा धनादेश आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहीद मेजर यांचे कुटुंबीय खेद व्यक्त करत आहेत.
मीरा रोड - शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या घरी पहाटे ३ वाजता अभिनेता अक्षयकुमार येऊन गेला. त्याने कुटुंबाला नऊ लाखांचा धनादेश आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहीद मेजर यांचे कुटुंबीय खेद व्यक्त करत आहेत. लोकांनी खात्री न करता असले संदेश व्हायरल करून मनस्ताप देऊ नये, अशी विनवणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, पत्नीच्या नावाने खोटी आॅडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांचा शोध पोलीस घेत आहेत.
कुठलीही खात्री न करता तसेच पहाटे ३ वा. अक्षयकुमार कशाला येईल, असा विचारही न करता असले मेसेज फॉरवर्ड केले जात असल्याबद्दल राणे यांच्या कुटुंबीयांनी खेद व्यक्त केला आहे. गैरसमज पसरवणारे मेसेज व्हायरल करू नका, असे आवाहन कुटुंबीयांकडून पुन्हा करण्यात आले आहे.
७ आॅगस्ट रोजी मंगळवारी पहाटे काश्मीरमध्ये सीमेवर घुसखोरी करणाºया अतिरेक्यांना कंठस्रान घालताना मेजर कौस्तुभ शहीद झाले. ९ आॅगस्ट रोजी मेजर यांच्या अंतिम यात्रेवेळी हजारो नागरिकांनी सहभाग घेत देशाच्या सुपुत्राला मानवंदना दिली. पण, त्याच्या आदल्या दिवसापासून वीरपत्नीचे मनोगत म्हणून निंदाजनक आॅडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. नागरिकांनी क्लिपची सत्यता आणि वस्तुस्थितीचे भान न पाहताच क्लिप फॉरवर्ड केली. अखेर, समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार झाली. मीरा रोड आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनीदेखील गांभीर्याने दखल घेत ही क्लिप खोटी असल्याने फॉरवर्ड करू नये, असे आवाहन केले. खोटे मेसेज व्हायरल करण्यात एका मुलीचाही सहभाग आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र याचा तपास सुरू असल्याने पोलिसांनी जास्त माहिती दिली नाही. मेजर कौस्तुभ यांची मामी वर्षा जाधव यांनीदेखील नागरिकांना आवाहन करत मनस्ताप होईल आणि शहिदाच्या कुटुंबीयांना त्रास होईल, असे काहीही करू नका, असे आवाहन केले आहे.
काही ठिकाणाहून शहिदाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी पैसे गोळा केले जात असल्याचे समजल्याने त्याबद्दलही कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती.
शासनाकडून २५ तर पालिकेकडून ११ लाखांची मदत
काश्मीर सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने २५ लाख, तर मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वतीने ११ लाख रु पये जाहीर करण्यात आल्याची माहिती महापौर डिम्पल मेहता यांच्या पालिका कार्यालयातून देण्यात आली.
मीरा रोडच्या शीतलनगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ राणे हे मंगळवार, ७ आॅगस्टच्या पहाटे सीमेवर घुसखोरी करणाºया अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले.
आ. नरेंद्र मेहता यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या वतीने २५ लाखांची रक्कम मेजर यांच्या कुटुंबीयांना जाहीर केली. तर, महापालिकेकडून ११ लाखांची रक्कम जाहीर करत आयुक्तांना तसा प्रस्ताव दिल्याचे महापौरांच्या वतीने पत्रकात म्हटले आहे.