राष्ट्रवादीत प्रवेश ही अफवा; भाजपामध्येच राहणार

By admin | Published: March 28, 2017 03:26 AM2017-03-28T03:26:05+5:302017-03-28T03:26:05+5:30

आपण भाजपातच राहणार असून राष्ट्रवादी प्रवेशाच्या निव्वळ अफवा आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरवणारे माझ्यावर

Rumors of entry into the NCP; The BJP will remain | राष्ट्रवादीत प्रवेश ही अफवा; भाजपामध्येच राहणार

राष्ट्रवादीत प्रवेश ही अफवा; भाजपामध्येच राहणार

Next

भुसावळ (जि. जळगाव) : आपण भाजपातच राहणार असून राष्ट्रवादी प्रवेशाच्या निव्वळ अफवा आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरवणारे माझ्यावर प्रेम करणारे भाजपाप्रेमी किंवा अन्य दुसरेही असू शकतात, अशी माहिती माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे दिली़
डुबती नैय्यात बसणार कोण?, अशी कोपरखळीही त्यांनी मारली़ गेल्या काही दिवसांपासून खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व नवाब मलिक यांच्याशी झालेल्या चर्चेचे फोटो व्हायरल झाल्याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी हा खोडसाळपणा असल्याचे सांगितले. स्वपक्षातल्या काहींचे आपल्यावर अधिक प्रेम आहे. त्यामुळेच हा प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले़
आपण भाजपा सोडणार हे कार्यकर्त्यांनादेखील पटणारे नाही़ ज्या पक्षाचा विस्तार आपण केला, तो पक्ष आपण सोडणार नाही़ जे आज पदावर बसलेले आहेत ते एका दिवसात बसलेले नाहीत, असे ते म्हणाले. जिल्ह्याची आधीची खडकाळ जमीन आपण सुपिक केली आहे, त्यामुळे तिच्यावर तण तर वाढणारच, असेही ते म्हणाले. पक्ष सोडण्याचा विचारही आपल्या मनात नाही़ काहींना मात्र अफवा पसरवण्यात आनंद मिळतो. जुने चार ते पाच वर्षांपूर्वीचे फोटो सोशल मीडियावर टाकले जात आहेत़ कुणाला तरी मी जास्त आवडायला लागलो आहे, हे यातून सिद्ध होते़ अफवा पसरवणारा पक्षातीलच आहे, असेही नाही. सहवासातून कदाचित हे प्रेम निर्माण झालेले असावे, असेही ते मिश्किलपणे म्हणाले. (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी विलीन होण्याची अफवा
शरद पवार यांना राष्ट्रपती बनवत असल्यास भाजपात विलीन करण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे, ही सोशल मीडियावरील चर्चाही अफवा असल्याचे एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Rumors of entry into the NCP; The BJP will remain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.