राष्ट्रवादीच्या खासदारांचे पक्षांतर ही अफवा
By admin | Published: May 29, 2017 04:08 AM2017-05-29T04:08:08+5:302017-05-29T04:08:08+5:30
‘राष्ट्रवादी काँग्रेस हा बलाढ्य पक्ष असल्याने पक्षाची प्रतीमा मलीन करण्याचा विरोधकांकडून वारंवार प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा बलाढ्य पक्ष असल्याने पक्षाची प्रतीमा मलीन करण्याचा विरोधकांकडून वारंवार प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे तीन खासदार भाजपच्या संपर्कात अशा अफवा पसरवल्या जात आहेत,’अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, धनंजय महाडिक व उदयनराजे भोसले हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांबाबत विचारले असता तटकरे म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे सिद्ध झाले आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने विरोधकांकडून राष्ट्रवादीची प्रतीमा मलीन करण्याचे काम सुरू आहे. जनतेत संभ्रम निर्माण केले जात आहेत. मात्र, अशा प्रकाराला कोणीही बळी पडणार नाही. पक्ष नेतृत्व शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. तसेच पक्ष संघटना मजबूत असून कोणाकडूनही पक्षांतर होणार नाही.’
भाजप सरकार शेतकरी विरोधी असून शेतकरी आत्महत्येबद्दल शासन गंभीर नाही. राज्य सरकारच्या धोरणामुळे गेल्या अडीच वर्षात १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एकंदरीत ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
उदयनराजेंविषयी भाष्य टाळले !
खासदार उदयनराजे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ते साताऱ्यात नाहीत. त्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, ‘कोणता गुन्हा दाखल आहे, कशाबद्दल आहे, याची मला माहिती नाही. त्यामुळे या विषयी मी अधिक भाष्य करू शकत नाही.’
१ जूनपासून राज्याचा दौरा
येत्या १ जूनपासून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शहर व जिल्ह्यात दौरा काढणार अहोत. यात लोकांचे प्रश्न समजून घेऊ.
- सुनील तटकरे,
प्रदेशाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस