खटला कोल्हापूरबाहेर चालवा
By Admin | Published: December 19, 2015 02:10 AM2015-12-19T02:10:54+5:302015-12-19T02:10:54+5:30
कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि सनातन संस्थेचा सदस्य समीर गायकवाड याने कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयातून खटला जिल्ह्याबाहेर वर्ग करण्यासाठी उच्च
मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि सनातन संस्थेचा सदस्य समीर गायकवाड याने कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयातून खटला जिल्ह्याबाहेर वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत यावर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष तपास पथकाने सप्टेंबर २०१५मध्ये समीरला सांगली येथून अटक केली. त्यानंतर समीरने १५ डिसेंबर रोजी हा खटला कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयातून राज्यात अन्य ठिकाणी वर्ग करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. ए.आर. जोशी यांच्या खंडपीठापुढे झाली. याचिकेनुसार, कोल्हापूर दंडाधिकाऱ्यांनी समीरचा रिमांड देताना पानसरेंच्या नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले. कायद्यानुसार, आरोपीला रिमांड देताना पीडितांच्या नातेवाइकांची बाजू ऐकण्याची तरतूद नाही. कनिष्ठ न्यायालय जनमतप्रवाहात वाहून गेल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे. त्याशिवाय कोल्हापूरमध्ये पानसरेंच्या समर्थकांनी भव्य रॅली काढून कोल्हापुरातील वातावरण दूषित केले आहे. हा खटला घेण्यास एकही वकील तयार नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा नाही, असे गायकवाडने याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)
पानसरे कुटुंबीयांचा विरोध
या खटल्यामध्ये पानसरे कुटुंबीयांचा अथवा अन्य कुणाचाच कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. गायकवाडनेही आजपर्यंत त्याबद्दल कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे हा खटला कोल्हापूरच्या बाहेर चालविण्याची मागणी करणे चुकीचे आहे. त्यास आमचा विरोध राहील, असे गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी म्हटले आहे.