उमेदवारांची व्याजाच्या पैशासाठी धावाधाव
By admin | Published: October 14, 2014 12:57 AM2014-10-14T00:57:58+5:302014-10-14T00:57:58+5:30
निवडणुकीचे वाढते बिग बजेट लक्षात घेता अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातूनच या उमेदवारांची व्याजाच्या पैशांसाठी धावाधाव सुरू आहे. मात्र यातही काही खरोखरच गरजू आहेत तर काही
राजेश निस्ताने - यवतमाळ
निवडणुकीचे वाढते बिग बजेट लक्षात घेता अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातूनच या उमेदवारांची व्याजाच्या पैशांसाठी धावाधाव सुरू आहे. मात्र यातही काही खरोखरच गरजू आहेत तर काही केवळ देखावा निर्माण करीत आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकांचे बजेट आघाडी व युती तुटल्याने चांगलेच वाढले आहे. कारण कार्यकर्ते व संबंधितांपुढे एक नव्हे तर चार प्रमुख सक्षम पर्याय उपलब्ध झाले आहेत. याशिवाय आणखी दोन ते तीन पर्याय प्रत्येक मतदारसंघात आहेतच.राजकीय आखाड्यात काही गब्बर उमेदवार आहेत. त्यातही सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. कारण गेली दहा वर्ष याच पक्षांची सत्ता आहे. गब्बर उमेदवाराच्या तोडीस तोड खर्च करता यावा म्हणून प्रचारात आघाडी घेतलेल्या मात्र आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या आणि अखेरच्या क्षणी पैशाने मागे पडलेल्या उमेदवारांनीही ऐनवेळी पैशाची जुळवाजुळव सुरू केली आहे. हे उमेदवार पैशासाठी फिरताना दिसत आहे. प्रत्येकच मतदारसंघात अर्थपुरवठा करणाऱ्यांची बरीच संख्या आहे. मात्र हा उमेदवार पडला तर पैसे कसे मिळणार म्हणून त्यांनी हात आखुडता घेतला आहे. त्यासाठी पैसे मागणाऱ्या उमेदवाराला हमीदार कोण, अशी विचारणा केली जात आहे किंवा त्याची संपत्ती तारण ठेवली जात आहे. जिंकून येण्याची खात्री असलेल्या उमेदवारालाच व्याजाने पैसा दिला जातोय, हे विशेष.
या पैशाचा व्याजाचा दर किमान साडेतीन टक्के असल्याचे सांगितले जाते. काही उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या गब्बर नेत्यांकडे आर्थिक पाठबळाची मागणी केली आहे. तर काही जण पक्षाकडे पार्टी फंडसाठी तगादा लावत आहे. पार्टी फंड वाटपाची जबाबदारी असलेले काही नेते स्वत:च रिंगणात असल्याने ते किती प्रामाणिकपणे फंड वाटतील याबाबत साशंकता आहे.
आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या उमेदवारांसोबतच काही गब्बर उमेदवारही ‘कुणी व्याजाने पैसे देणारा आहे का’, अशी विचारणा करताना दिसत आहे. त्यांची ही विचारणा पाहून कुणाला विश्वास बसत नाही. मात्र या मागणीला विविध पैलू आहेत. उमेदवाराजवळचे पैसे संपले असे वातावरण निर्माण केल्यास कार्यकर्ते जास्त त्रास देणार नाही, हा एक प्रमुख उद्देश आहे. शिवाय आपल्याकडे दोन नंबरचा पैसा नाही, हे दाखविण्यासाठीसुद्धा व्याजाचा पैशाचा देखावा निर्माण केला जातो आहे.
काही उमेदवारांकडे भक्कम पैसा आहे, मात्र घरावर आयोगाची नजर असल्याने हा पैसा घराबाहेर काढणे त्यांना धोक्याचे वाटत आहे. म्हणून तात्पुरती व्यवस्था बाहेरून करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आचारसंहिता संपल्यानंतर आयोगाचा वॉचही संपुष्टात येत असल्याने नंतर हळूच काळापैसा घराबाहेर काढण्याचे प्लॅनिंग आहे. काही उमेदवारांनी अचानक सर्च होण्याच्या भीतीने आपल्या विश्वासू शेजाऱ्यांकडे, मित्रांकडेसुद्धा मोठ्या रकमा ठेवल्याचे समजते.
युती-आघाडी तुटल्याने अनेकांना अनपेक्षितरीत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले. त्यामुळे त्यांची कोणतीच तयारी नव्हती. आता काही उमेदवार अक्षरश: कोरे स्टॅम्प पेपर घेऊन फिरत असल्याचे पहायला मिळत आहे. हे चित्र एकट्या यवतमाळ जिल्ह्यात अथवा विदर्भात नसून राज्याच्या अनेक विधानसभा मतदारसंघात आहे.