धावती गाडी पकडणे जिवावर बेतले
By admin | Published: June 26, 2017 02:47 AM2017-06-26T02:47:12+5:302017-06-26T02:47:12+5:30
धावत्या ज्ञानेश्वरी समरसता एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा पाय घसरून ठाणे स्टेशनवरील प्लॉटफार्मच्या गॅपमध्ये दूरवर फरफटत गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : धावत्या ज्ञानेश्वरी समरसता एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचा पाय घसरून ठाणे स्टेशनवरील प्लॉटफार्मच्या गॅपमध्ये दूरवर फरफटत गेला. प्रवाशांनी आरडाओरड करीत गाडी थांबवून त्यास बाहेर काढले. सदर प्रवाशास सिव्हील रुग्णालयात त्यास दाखल केले असता उपचारादरम्यान शनिवारच्या मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.
मुंबईहून हावडा जाण्यासाठी निघालेली ज्ञानेश्वरी समरसता एक्स्प्रेस सिग्नल नसल्यामुळे येथील प्लॉटफार्म क्र. ७ वर शनिवारी रात्री थांबली होती. काही प्रवासी उतरून प्लॉटफार्मवर फिरत होते. तेवढ्यात सिग्नल मिळाल्यामुळे गाडी सुटली. आॅर्थररोड येथे राहणाऱ्या सुनिल शर्मा (२८) या युवकाने धावत येऊन गाडी पकडण्याचा प्रयत्न केला; पण पायातील बूट सटकल्यामुळे प्लॉटफार्म गॅपमध्ये शर्मा दूरवर फरफटत गेला. उभ्या असलेल्या लोकांनी आरडाओरड केल्यामुळे प्रवाशांनी चैन ओढून गाडी थांबवली. त्यास कसेबसे बाहेर काढले असता त्यांच्या डोक्याला, हातापायाला गंभीररित्या मार लागल्याने रक्तस्त्राव सुरू होता. त्यास उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे ठाणे रेल्वे स्टेशन पोलिसांनी सांगितले.