धावाधाव ... प्रतिष्ठा पणाला...

By admin | Published: October 2, 2014 01:10 AM2014-10-02T01:10:57+5:302014-10-02T01:10:57+5:30

अनेक दशकानंतर युती आणि आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरल्याने आणि मनसेसह इतरही छोटे पक्ष निवडणूक लढवीत असल्याने, नागपूर जिल्ह्यातील १२ ही मतदारसंघांत बहुरंगी लढत होणार आहे.

Running ... prestige ... | धावाधाव ... प्रतिष्ठा पणाला...

धावाधाव ... प्रतिष्ठा पणाला...

Next

मैदान कोेण मारणार?
नागपूर : अनेक दशकानंतर युती आणि आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरल्याने आणि मनसेसह इतरही छोटे पक्ष निवडणूक लढवीत असल्याने, नागपूर जिल्ह्यातील १२ ही मतदारसंघांत बहुरंगी लढत होणार आहे.
जिल्ह्यात एकूण शहरातील सहा मतदारसंघांत ११६ तर ग्रामीणमधील सहा मतदासंघांत ९५ असे एकूण २११ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातून एकूण ६५ उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. शेवटच्या दिवशी माघार घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने प्रमोद मानमोडे आणि राष्ट्रवादीचे राजेश नागुलवार यांनी दक्षिणमधून अर्ज मागे घेतले. रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये प्रामुख्याने माजी मंत्री अनिल देशमुख (काटोल), नितीन राऊत (उत्तर नागपूर), सतीश चतुर्वेदी (दक्षिण नागपूर), अनिस अहमद (मध्य नागपूर), भाजपचे विद्यमान आमदार आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस (दक्षिण-पश्चिम), विद्यमान आमदार दीनानाथ पडोळे (दक्षिण नागपूर), भाजपचे विकास कुंभारे (मध्य नागपूर), कृष्णा खोपडे (पूर्व नागपूर), सुधाकर देशमुख (पश्चिम), ग्रामीणमध्ये सुनील केदार (सावनेर), भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), सुधीर पारवे (उमरेड), शिवसेनेचे आशिष जयस्वाल (रामटेक) यांचा समावेश आहे.
दक्षिण नागपूरमध्ये शिवसेनेचे शेखर सावरबांधे यांनी बंड केले आहे, तर याच मतदारसंघात काँग्रेसचे दीनानाथ पडोळे या काँग्रेसच्या विद्यमान आमदाराने यावेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेतली आहे. शिवसेनेला उत्तर नागपूरमधून उमेदवार देता आला नाही, तर सावनेरमध्ये भाजप उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाल्याने तेथे भाजपचा उमेदवार नाही. तीन ठिकाणी मनसेचे उमेदवार नाहीत.
लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने गुरुवारपासून प्रचाराला गती येणार आहे. दसऱ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांचे दौरे नागपूरमध्ये आहेत. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूरमध्ये आहेत. (प्रतिनिधी)
ईव्हीएम अधिक लागणार
बारापैकी सहा मतदारसंघात १७ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्याने तेथे दोन ईव्हीएम लागणार आहे. प्रशासनाने याचे यापूर्वीच नियोजन केले आहे. लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता हे येथे उल्लेखनीय.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधारावर या निवडणुकीत ईव्हीएमचे (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार बॅलेट युनिट ४८६२ आणि कंट्रोल युनिट ४८६२ लागणार होत्या. मात्र निवडणूक शाखेने १० हजार बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील विधानसभेचे १२ मतदारसंघ आहेत. एका ईव्हीएममध्ये १६ उमेदवारांची नावे येऊ शकतात व एक बटन हे नकारात्मक मतदानासाठी असते. शहरातील दक्षिण नागपूर मतदारसंघात १८ मध्य, उत्तर आणि पूर्व नागपूरमध्ये प्रत्येकी २० आणि पश्चिम नागपूरमध्ये २२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे तेथे एका केंद्रावर एकापेक्षा अधिक ईव्हीएमची गरज भासणार आहे. मतदारांनाही त्यांच्या पसंतीचा उमेदवार शोधण्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. दोन्ही यंत्रावरची नावे पाहून नंतर पसंतीच्या उमेदवारापुढील बटन दाबावे लागणार आहे.

Web Title: Running ... prestige ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.