पनवेल महापालिकेसाठी रणसंग्राम सुरू
By admin | Published: April 20, 2017 03:30 AM2017-04-20T03:30:47+5:302017-04-20T03:30:47+5:30
पनवेल महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले. पालिकेचा रणसंग्राम खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे
नवी मुंबई : पनवेल महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले. पालिकेचा रणसंग्राम खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. देशातील सर्वात झपाट्याने विकसित होणाऱ्या या महानगराच्या निवडणुकीकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपा, शेतकरी कामगार पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली असून पहिल्याच निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील पहिली नगरपालिका असणाऱ्या पनवेलचे १ आॅक्टोबरला महापालिकेत रूपांतर झाले. २७ वी महापालिका असली तरी झपाट्याने विकसित होणारे देशातील एक क्रमांकाचे शहर म्हणून या परिसराचा देशभर नावलौकिक आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल्वे प्रकल्प, महत्त्वाकांक्षी नैना प्रकल्प याच परिसरात आहे. भविष्यात मुंबईनंतर देशातील सर्वात प्रमुख शहर पनवेलच असल्याने महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्याच निवडणुकीमध्ये विजयाचा झेंडा फडकवायचा व पहिला महापौर आपल्याच पक्षाचा झाला पाहिजे यासाठी राजकीय पक्षांनी आॅक्टोबरपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पनवेल नगरपालिका, २९ महसुली गावे, सिडको विकसित परिसर अशा ११० हेक्टर परिसरामध्ये विखुरलेल्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी २४ मे रोजी निवडणूक होणार आहे. २९ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून २६ मे रोजी मतमोजणीतून पनवेलवर सत्ता कोणाची याचा निर्णय होणार आहे. वास्तविक पनवेल महापालिका बनविण्यासाठी २५ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. नगरपालिकेने त्याविषयी ठरावही मंजूर केला होता. अखेर सर्वांच्या प्रयत्नाने १ आॅक्टोबर २०१६ ला महापालिकेची अधिकृत घोषणा झाली व सहा महिन्यांत पहिली सार्वत्रिक निवडणूक घोषित करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्षांनी जल्लोष साजरा केला आहे. पनवेलवर सत्ता कोणाची याविषयी चर्चेला वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेला गवसणी घालण्याचा दावा करण्यास सुरवात केली असली तरी खरी लढत भारतीय जनता पक्ष व शेतकरी कामगार पक्ष यांच्यामध्येच असणार आहे. भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यावर निवडणुकीची धुरा आहे. पहिल्या निवडणुकीत भाजपाने यश मिळविले तर पक्षामध्येही ठाकूर पिता - पुत्रांचे वजन वाढणार आहे. याशिवाय वैयक्तिकदृष्ट्याही ही निवडणूक त्यांच्या अस्मितेची ठरणार आहे. पनवेल हा अनेक वर्षांपासून शेकापचा बालेकिल्ला राहिलेला आहे. यामुळे माजी आमदार विवेक पाटील, बाळाराम पाटील यांच्यासह पक्षाचे रायगडमधील प्रमुख नेते निवडणुकीमध्ये स्वत:ला झोकून देणार हे स्पष्ट होणार आहे. शेकापसाठीही ही निवडणूक नवसंजीवनी देणारी ठरणार आहे.
याशिवाय शिवसेना, काँगे्रस, राष्ट्रवादी, मनसेसह सर्वच राजकीय पक्षांची कसोटी लागणार असून सत्ता कोणाची हे पुढील ३५ दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.
मतदार जाणार सुटीवर
महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होत आहे. कडक उन्हाळा व सुटीमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक मूळ गावाकडे रवाना होवू लागले आहेत. यामुळे मूळ गावठाण वगळता इतर परिसरातील बहुतांशी मतदार गावी जाण्याची शक्यता आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा जल्लोष : महापालिका निवडणुकीची घोषणा होताच शेतकरी कामगार पक्षाने जल्लोष साजरा केला. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी निवडणूक आयुक्त सहारिया यांची भेट घेवून निवडणुका तत्काळ घेण्याची मागणी केली होती. दुसरीकडे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, पक्षप्रवक्ते माधव भंडारी यांनीही निवडणूक आयुक्तांची भेट घेवून उन्हाचा पारा व उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मतदार गावी जाण्याची शक्यता व्यक्त केली होती.