"देश चालवणं म्हणजे फक्त मंदिर बांधणं नाही, जमत नसेल तर...", किरण मानेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 04:36 PM2024-06-24T16:36:38+5:302024-06-24T16:43:16+5:30

किरण माने यांनी म्हटले आहे की, केंद्रात कशीबशी सत्ता आली म्हणून कितीही टणाटणा उड्या मारूद्यात... या टग्यांना महाराष्ट्रात ठाकरे, पवारांची आणि देशात राहुल गांधींची जबरदस्त दहशत बसलेली आहे.

"Running the country is not just about building a temple, if it is not possible...", Kiran Mane's attack on the Modi government | "देश चालवणं म्हणजे फक्त मंदिर बांधणं नाही, जमत नसेल तर...", किरण मानेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

"देश चालवणं म्हणजे फक्त मंदिर बांधणं नाही, जमत नसेल तर...", किरण मानेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून विरोधक सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. आधी पेपरफुटी आणि त्यानंतर अचानक रद्द केलेली पीजी परीक्षा, यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. या पेपरफुटी प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधकांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. अशातच आता अभिनेता किरण माने यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट करत केंद्र सरकारवर हल्लबोल करत काही सवाल उपस्थित केले आहेत.  

किरण माने यांनी म्हटले आहे की, केंद्रात कशीबशी सत्ता आली म्हणून कितीही टणाटणा उड्या मारूद्यात... या टग्यांना महाराष्ट्रात ठाकरे, पवारांची आणि देशात राहुल गांधींची जबरदस्त दहशत बसलेली आहे. इलेक्शन कमिशनपास्नं इव्हीएमपर्यन्त सगळे हाताशी घेऊनही जनतेनं लाथ घातल्यामुळे या हुकूमशहांचा माज ठेचला गेलाय.एरवी, मणिपूर धिंड आणि कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणासारख्या गंभीर मुद्यांकडे माजोरडेपणानं डोळेझाक करणारे हे दगडाच्या काळजाचे लोक... NEET परीक्षेमधल्या घोटाळ्याला या कोडग्यांनी भिकसुद्धा घातली नसती. उडवुन लावलं असतं. पण केंद्रात कुबड्या घेऊन सत्तेत आलेत. न ऐकून सांगतायत कुणाला??

इकडे आदित्य ठाकरेंनी 'ॲॅंटी पेपर लीक कायदा आणून सीईटी आयुक्तांवर कारवाई करावी' असा इशारा देणारी दणदणीत प्रेस काॅन्फरन्स घेतली... तिकडे राहुल गांधींनीही असं रान पेटवलं... लगेच अनाजीपंतांपास्नं रंगाबिल्लापर्यंत सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली ! आदित्य ठाकरेंच्या आग्रही मागणीपुढे केंद्रसरकारला नाक घासावं लागलं. 'ॲॅंटी पेपर लीक' कायद्याला शेवटी मंजुरी द्यावीच लागली. आता पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. डायरेक्टर जनरल सुबोधकुमारलाही हाकलावं लागलं. राहुल गांधींनी केलेल्या गंभीर आरोपांपुढे झुकून युजीसी नेटची आणि NEET ची सीबीआय चौकशीही केली जाणार आहे. पण... एवढंच पुरेसं आहे का? असे किरण माने यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत झालेलं नुकसान कोण भरुन देणार? या परीक्षा रद्द करून तरूण पोरापोरींच्या करीयरशी जीवघेणा खेळ खेळला जातोय. मागच्या दहा वर्षांत जवळजवळ पन्नास पेपर लीक झालेत. कितीतरी हुशार, प्रतिभावान पोरापोरींचे आयुष्य उद्धवस्त झालंय. काहींनी आत्महत्या केल्यात. काहींनी गुणवत्तेला मुरड घालून कमी दर्जाच्या नोकर्‍या स्विकारल्यात. याचा जाब सरकारला हडसून-खडसुन विचारायला हवा. या देशात शिक्षण व्यवस्थेचा पुर्णपणे सत्यानाश झालेला आहे. सत्ताधार्‍यांना 'हिंदु-मुस्लीम, मराठा-ओबीसी, दलित-सवर्ण, मंदिर-मस्जीद' यापलीकडे काहीही दिसत नाहीये. देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही! जमत नसेल तर सरळ राजीनामा देऊन हिमालयात ध्यान करायला जा. 'काबिल' माणूस बसवा खुर्चीवर, असे म्हणत सोशल मीडिया पोस्टद्वारे  किरण माने यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Web Title: "Running the country is not just about building a temple, if it is not possible...", Kiran Mane's attack on the Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.