"दळभद्री इतिहास सांगून लोकांच्या...", रुपाली चाकणकरांची जितेंद्र आव्हाडांच्या 'त्या' वक्तव्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 06:45 PM2024-01-04T18:45:46+5:302024-01-04T18:49:31+5:30
महाराष्ट्र शांत असून तो शांतच असू द्या, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
मुंबई : अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन २२ जानेवारीला करण्यात आले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मेळाव्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील पक्षाच्या मेळाव्यात राम मांसाहारी होता, असे वक्तव्य केले. त्यानंतर राज्यभरात त्यांच्या वक्तव्यवरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
भाजपा, शिवसेना शिंदे गटाकडून याचा प्रखर विरोध करण्यात आला आहे, तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशीही काहींनी मागणी केली आहे. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीही यावर भाष्य केले आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत रुपाली चाकणकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच, महाराष्ट्र शांत असून तो शांतच असू द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
"साईबाबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शिर्डी मधील शिबिरात विचारांची ज्योत पेटवायची सोडून धार्मिक विखारांनी आग लावण्याचे काम जितेंद्र आव्हाडांनी केले. ज्या पवित्र भूमीत सर्व धर्मातील भाविक दर्शनाला येतात. त्या ठिकाणी दळभद्री इतिहास सांगून लोकांच्या भावना भडकवण्याचे काम केले आहे. मागे पोपटपंची करताना हेच महाशय म्हणाले होते "हे वर्ष दंगलींचं वर्ष असेल." त्या वाक्याला खरं करण्यासाठी तर हा आटापिटा सुरू नाही ना? महाराष्ट्र शांत आहे, शांतच राहू द्या", असे रुपाली चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
याचबरोबर, "लोकांना प्रभू श्रीरामबद्दल प्रेम आहे, त्यामुळे मुद्दाम बोलून लोकांच्या भावना भडकवण्याचे राजकारण बंद करा. उद्या महाराष्ट्रात काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊन या महाशयांवर कठोर कारवाई करावी", अशीही मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. दरम्यान, भाजपाने देखील जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा आमदार राम शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांच्या अटकेची मागणी केली आहे.
साईबाबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या शिर्डी मधील शिबिरात विचारांची ज्योत पेटवायची सोडून धार्मिक विखारांनी आग लावण्याचे काम जितेंद्र आव्हाडांनी केले. ज्या पवित्र भूमीत सर्व धर्मातील भाविक दर्शनाला येतात..1/2@maharashtra_hmopic.twitter.com/eDigXa3xT0
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 4, 2024
वादानंतर आव्हाडांचं स्पष्टीकरण
प्रभू राम जिथून गेले त्या गावचा माणूस मी आहे. त्यामुळे मला राम कुणी सांगू नये. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. मी पुरंदरेंच्या विरोधात बोललो तेव्हा मला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी माफी मागायला सांगितली होती. पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवू शकत नाही असं पवारांनी मला स्पष्ट सांगितले होते. मी एकटा लढतो. रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणे सोपे आहे. कुठलेही भाष्य असते कार्यकर्त्यांनी पटतं ते घ्यावे आणि बाकी सोडून द्यावे. वाल्मिकी रामायणात जे लिहिलंय ते मी बोललो. लोकभावनेचा आदर करतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधानावर दिले आहे.