तीन महिन्यांत रुपयाचे १३ टक्क्यांनी झाले अवमूल्यन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 11:06 AM2018-10-06T11:06:34+5:302018-10-06T11:07:45+5:30
कापसाची पंजाब, हरियाणा व राजस्थानमध्ये आवक सुरू झाली आहे. बाजारात ५ हजार ७०० ते ६ हजार रुपये प्रति क्विंटलचे भाव आहेत. म्हणजेच हमी किमतीपेक्षा थोडे जास्त आहेत. रुपयाच्या अवमूल्यनाचा हा फायदा आहे.
*विजय जावंधिया (शेतकरी नेते)*
कापूस, सोयाबीन, भुईमुगाची आवक सुरू होणार आहे. कापसाची पंजाब, हरियाणा व राजस्थानमध्ये आवक सुरू झाली आहे. बाजारात ५ हजार ७०० ते ६ हजार रुपये प्रति क्विंटलचे भाव आहेत. म्हणजेच हमी किमतीपेक्षा थोडे जास्त आहेत. रुपयाच्या अवमूल्यनाचा हा फायदा आहे. या तीन महिन्यांत १३ टक्क्यांनी रुपयाचे अवमूल्यन झाले आहे.
जागतिक बाजारात डॉलरमध्ये कापसाच्या भावात फक्त ५ ते १० टक्केच वाढ आहे. ७५ सेंट प्रति पाऊंड त-हेचे हमीभाव ८५ सेंट प्रति पाऊंडपर्यंत आहेत. भारतात सरकीच्या भावात गेली दोन वर्षे तेजी होती. त्यामुळेही कापसाचे भाव हमी किमतीपेक्षा जास्त दिले. आज २ हजार २०० रुपयांच्या आसपास सरकीचा भाव आहे. हा भाव टिकून राहिला व रुपया ७३-७५ रुपये १ डॉलर हा विनियम दर राहिला तर कापसाला ६ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कापूस आयातीवर आयात कर नाही व निर्यातीलाही सबसिडी नाही.
रुपयाच्या अवमूल्यनानंतरही ऊस, तेलबिया, डाळी उत्पादक शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठेत फटकाच बसणार आहे. सरकारच्या प्रचंड हस्तक्षेपाची गरज आहे. आज जागतिक बाजारात साखरेचा भाव ३३० डॉलर प्रति टन (म्हणजे १० क्विंटल) आहे. म्हणजेच २३-२४ रुपये किलो आहे. सरकारने ५० टक्के आयात कर लावला आहे. साखर निर्यातीला सबसिडी दिली आहे. ती वाढविण्याचा विचार सुरू आहे. खाद्य तेलाची ६० टक्के आपण आयात करतो. खाद्य तेलात प्रचंड मंदी आहे. ४० ते ५० टक्के आयात कर लावला आहे. तरी ६० ते ७० रुपयेच आयात तेलाचा भाव आहे.
सोयाबीन, भुईमूग यांना हमीभाव मिळण्याची शक्यता कमीच आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे थोड्या फार प्रमाणात शेतक-यांचे संरक्षण होईल; पण सरकारच्या हमीभावाच्या खरेदीचे संरक्षण गरजेचे झाले आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत असताना बाजाराची ही विषम परिस्थिती आहे.