दिवसभरात रुपयाचीही चोरी नाही
By admin | Published: November 11, 2016 05:20 AM2016-11-11T05:20:41+5:302016-11-11T05:20:41+5:30
हजार-पाचशेच्या नोटा चलनातून हद्दपार करण्यात आल्याने शहरातील चोरट्यांच्या कारवायाही थांबल्या आहेत.
औरंगाबाद : हजार-पाचशेच्या नोटा चलनातून हद्दपार करण्यात आल्याने शहरातील चोरट्यांच्या कारवायाही थांबल्या आहेत. १५ लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहरात गेल्या २४ तासांत एका रुपयाही चोरीस गेलेला नाही. पोलिसांसाठी हा सुखद धक्का असून, विनासायास गुन्हे थांबल्याने ते अचंबितही झाले आहेत.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात रोज लुटमारीच्या चार ते पाच घटना घडतात. तसेच सात ते आठ घरफोड्यांची नोंद होते.
मात्र हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बाद झाल्यापासून शहरातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या अचानक घटली आहे. आयुक्तालयाच्या हद्दीतील १५ पोलीस ठाण्यांतर्गत दररोज सरासरी ३५ ते ३६ गुन्हे नोंदविले जातात. २४ तासांत मात्र, गुन्ह्यांची संख्या १४ पर्यंत खाली आली. त्यात अंबेलोहळ येथील एक बीअर शॉपी फोडून चोरट्यांनी बीअरचे बॉक्स पळवून त्यांच्या सुट्यांच्या दिवसांची तरतूद केली असावी. मुकुंदवाडी परिसरातील एका घरातून दोन मोबाईल चोरीला गेले. सोन्याला आलेली झळाळी पाहता सिडकोत एकास मारहाण करून सोन्याची चेन पळविल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली.
३० डिसेंबरपर्यंत बाद चलन बँकेत जमा होऊन नवीन नोटा व्यवहारात व घरात येतील. तोपर्यंत चोरट्यांचा जणू विश्रांती काळच असल्याची गमतीदार चर्चा पोलीस दलात सुरू होती.
बँकेतील गर्दीत
वृद्धेच्या मांडीचे हाड मोडले
बँकेत पैसे भरण्यासाठी उसळलेल्या प्रचंड गर्दीमुळे जिन्यावरून कोसळून एका वृद्धेच्या मांडीचे हाड मोडल्याची घटना गुरुवारी दुपारी नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे घडली.
ललिताबाई विठ्ठल पाटील (६५) ह्या गावातील बँक आॅफ महाराष्ट्रच्या ग्रामपंचायत इमारतीतील शाखेत ८० हजार रुपये जमा करण्यासाठी गेल्या होत्या़ तिसऱ्या मजल्यावर असलेल्या बँक शाखेत जाण्यासाठी पहिल्या मजल्यापासून रांगा लागल्या होत्या़
दुपारी तीन वाजेच्या सुमारास याठिकाणी अधिकच दाटीवाटी होऊन गर्दीचा लोंढा अंगावर आल्याने रांगेत उभ्या असलेल्या ललिताबाई जिन्यावरून खाली पडल्या, यात त्यांच्या मांडीचे हाड मोडले. त्यांच्यावर शहादा येथे खासगी रुग्णालयात तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
लोणार सरोवराकडे पर्यटक फिरकला नाही
लोणार (जि. बुलडाणा) : पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयाचा मोठा फटका विदेशी पर्यटकाना बसला. कुणीही पाचशे व हजार रुपयांच्या नोटा घेण्यास तयार नसल्यामुळे अनेक विदेशी पर्यटक येथून परत गेले. दरम्यान, गुरुवारी येथे एकही नवीन देशी-विदेशी पर्यटक आल्याची नोंद झाली नाही.
जागतिक पर्यटनस्थळ असलेले लोणार सरोवर पाहण्यासाठी विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. आॅस्ट्रेलिया, जर्मनी आदी देशातून आलेल्या पर्यटकांच्या नोटा स्वीकारण्यास कुणीही तयार नसल्यामुळे शेवटी त्यांनी मुक्कामाचे हॉटेल सोडले आणि परतण्याचा निर्णय घेतला.