लातुरात मुगाची आवक स्थिर, ४५० रुपयांनी भाव वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:43 AM2018-10-08T11:43:19+5:302018-10-08T11:44:34+5:30
बाजारगप्पा : मुगाची आवक स्थिर असली तरी या आठवड्यात दरात ४५० रुपयांची वाढ झाली आहे़
- हरी मोकाशे (लातूर)
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत महिनाभरापासून घटलेली शेतमालाची आवक आता वाढत आहे़ पंधरा दिवसांपासून सुरू असलेली मुगाची आवक स्थिर असली तरी या आठवड्यात दरात ४५० रुपयांची वाढ झाली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचा काही प्रमाणात आर्थिक लाभ होत आहे़
राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये लातूर बाजार समिती आहे़ येथील बाजारपेठेत चांगला दर मिळतो, असा शेतकऱ्यांना अनुभव आहे़ त्यामुळे लातूरसह, परजिल्ह्यातील तसेच शेजारील कर्नाटक, तेलंगणा राज्यातील काही शेतमाल येथे विक्रीसाठी येतो़ पावसाने गुंगारा दिल्यामुळे मूग, उडदाच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे़ सोयाबीची काढणीही सुरू झाली आहे़ दररोज ८ ते १० पोते नवीन सोयाबीनही विक्रीसाठी येऊ लागले आहेत़
मागील आठवड्यात मुगाला प्रति क्विंटल सर्वसाधारण दर ४ हजार ३९० रुपये मिळत होता़ या आठवड्यात तो ४ हजार ८५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ त्याचबरोबर उडदाची आवक जवळपास ६०० क्विंटलने वाढली. सर्वसाधारण दरात २०० रुपयांची वाढ होऊन तो ४ हजार २५० रुपयांवर स्थिरावला आहे़ गतवर्षीच्या सोयाबीनची बाजारपेठेत आवक वाढली आहे़; परंतु दीडशे रुपयांनी घट झाली आहे़ ३ हजार १५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ तुरीची आवक घटली असून, ती दररोज ५५० क्विं़पर्यंत होत आहे़ आवक घटली की दर वाढतो, या बाजारपेठेतील नियमाप्रमाणे दरात १२० रुपयांनी वाढ झाली आहे़ रबीतील हरभऱ्याची दैनंदिन आवक दोन हजार क्विं़पर्यंत असून, दरात ४८० रुपयांनी वाढ झाली आहे़ सध्या ४ हजार ८० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ गव्हास सर्वसाधारण दर १९००, हायब्रीड ज्वारी १२५०, रबी ज्वारी १८००, पिवळी ज्वारी २३५०, करडई ३६०० आणि तिळास प्रति क्विं़ ८ हजार रुपये दर मिळत आहे़
दरम्यान, बाजारपेठेत नवीन शेतमालाच्या दरात वाढ होत असली तरीही केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मूग उत्पादकांना प्रति क्विंटल २ हजार १२५, उडदातून १ हजार ३५० रुपये कमी मिळत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी शासनाने आधारभूत किमतीनुसार हा शेतमाल विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्याची मुदत ९ आॅक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे. प्रत्यक्षात नाफेडचे पोर्टलच सुरू झाले नसल्याने आठवडा उलटला तरीही आॅनलाईन खरेदी सुरू झाली नाही.
नाफेडअंतर्गत खरेदीदार संस्थांची माहिती मिळविण्यातच नाफेड हैराण आहे. नोंदणीसाठी सध्या शेतकऱ्यांच्या हातात केवळ ३ ते ४ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नियोजित वेळेत आपल्या नावाची नोंदणी होईल काय? नोंद झाली तर मालाची खरेदी कधी होणार? पैसे हाती कधी पडणार? असे नानाविध सवाल शेतकऱ्यांच्या मनात घोळत आहेत. कारण दसरा, दिवाळी सण तोंडावर आहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर लेकीबाळी माहेरी येतात, त्यांना कपडेलत्ते करणे गरजेचे असते. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे हवे आहेत.