रुपेश मुळे नरबळी प्रकरणातील साक्ष संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 07:36 PM2016-06-22T19:36:27+5:302016-06-22T19:36:27+5:30
जिल्ह्यात नाही तर राज्यात गाजलेल्या रुपेश मुळे नरबळी प्रकरणात बुधवारी अंतिम साक्ष नोंदविण्यात आली.
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 22 - जिल्ह्यात नाही तर राज्यात गाजलेल्या रुपेश मुळे नरबळी प्रकरणात बुधवारी अंतिम साक्ष नोंदविण्यात आली. तपासी अधिकारी वर्धेचे तत्कालीन ठाणेदार मुरलीधर बुराडे याच्या उलट तापसणीने साक्ष पुराव्याला विराम देण्यात आला. या प्रकरणात पुढील सुनावणी येत्या 30 जून रोजी होणार आहे.
या प्रकरणात अखेरची साक्ष पोलीस निरीक्षक बुराडे यांची होती. त्याची उलट तपासणी झाली. यात बुराडे यांनी झालेल्या घटनेची माहिती तक्रारीनुसार दिली. न्यायाधीश अनिरुद्ध चांदेकर यांच्या समक्ष सरकारी वकील अनुराधा सबाने यांनी त्यांची उलटतपासणी केली. यात पहिले दिलेली साक्ष याही वेळी त्यांनी कायम ठेवल्याचे दिसून आले. या प्रकरणातील सर्वच सक्षदारांच्या साक्षी संपल्याने आता सर्वाना निकालाची प्रतीक्षा आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी असिफ शहा सध्या जिल्हा कारागृहात आहे. आतापर्यंत झालेल्या साक्ष पुराव्यातून आरोपीनेच अघोरी शक्ती वाढविण्यासाठी रुपेशचा नरबळी दिल्याचे सिद्ध होत असल्याचे न्यायालयीन सूत्रांनी सांगितले. यामुळे आरोपीची शिक्षा अटळ असल्याचे बोलले जात आहे.