ग्रामीण महाराष्ट्रानेही काँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारले..!

By admin | Published: February 24, 2017 04:12 AM2017-02-24T04:12:08+5:302017-02-24T04:12:08+5:30

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजकारण कायम सहकार चळवळी आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जोरावर

Rural Maharashtra also rejected Congress, NCP ..! | ग्रामीण महाराष्ट्रानेही काँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारले..!

ग्रामीण महाराष्ट्रानेही काँग्रेस, राष्ट्रवादीला नाकारले..!

Next

अतुल कुलकर्णी / मुंबई
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजकारण कायम सहकार चळवळी आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या जोरावर चालत आले. त्याच ‘व्होट बँके’ला जबरदस्त धक्का देत शहरी तोंडवळ्याच्या भाजपाने ग्रामीण भागात वाजत गाजत प्रवेश केला हे या मिनी विधानसभा निवडणुकीचे मोठे फलित ठरले आहे.
ग्रामीण भागात मुसंडी मारत भाजपाने सहा जिल्हा परिषदा आणि आठ जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये आपला प्रवेश स्वबळावर निश्चित केला आहे. दोन्ही काँग्रेसच्या नाराज नेत्यांना भाजपाने स्वत:कडे खेचून घेत हे यश संपादन करत ‘काँग्रेसमुक्त भारत’ या मोदींच्या घोषणेला फडणवीसांनी हातभार लावला आहे त्यामुळे ‘भाजपाच्या चिन्हावर राष्ट्रवादीला बहूमत’ अशी खोचक प्रतिक्रीया या निकालानंतर आली त्यातच सगळे काही आले.
मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या हाणामाऱ्या चव्हाट्यावर आल्या. हेकटपणा करण्यात मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि गुरुदास कामत या दोघांनीही कसर सोडली नाही आणि हा सगळा तमाशा शांतपणे पहात बसण्यात पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश शंभर टक्के यशस्वी झाल्याने मुंबईत काँग्रेसची वाताहात झाली. एवढे सगळे घडून, कोणीही प्रचारात जीव न ओतताही मुंबईत काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या कशा याचीच चर्चा आता सुरु झाली आहे. निरुपम यांनी आता मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन स्वत:ची सुटका करुन घेतली आहे.
प्रदेश काँग्रेसची अवस्थाही दिशाहीन भरकटलेल्या जहाजासारखी झाली. मोहन प्रकाश यांनी पक्षपातळीवर कोणताही समन्वय साधण्याचे काम केले नाही. या निवडणुकीत त्यांनी नेमके केले तरी काय? हा संशोधनाचा विषय आहे. पक्षाकडे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे अशा तीन तीन माजी मुख्यमंत्र्यांची फौज असूनही कोणातही एकवाक्यता नव्हती. मुंबईच्या भांडणाकडे अशोक चव्हाण यांनी पाठ फिरवली आणि निकाल लागताच निरुपमच या पराभवाला दोषी आहेत असे सांगत राणे यांनी स्वत:ची जबाबदारी ढकलून दिली. पृथ्वीराज चव्हाणांनी मुंबईसाठी फक्त एक पत्रकार परिषद घेण्याचे कर्तव्य पार पाडले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातल्या या निवडणुकांसाठी किती सभा घेतल्या हे जाहीरपणे सांगावे. विखे यांनी बाळासाहेब थोरात यांच्याशी भांडण्यात सगळा वेळ घालवला. प्रत्येकाच्या व्यक्तीगत महत्वाकांक्षा आणि फायद्या तोट्याच्या संकल्पना पक्षाच्या यशापेक्षा मोठ्या झाल्या आणि काँग्रेसला अहमदनगर, नांदेड, सिंधूदूर्ग, अमरावती या पाच जिल्हा परिषदांवर समाधान मानावे लागले. विलासराव देशमुख नसल्याची जाणीव आज अनेकांना झाली ती लातूरात भाजपाचे मंत्री संभाजी निलंगेकर यांनी मारलेल्या मुसंडीमुळे. राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे बडे नेतेही सांगली जिल्हापरिषद वाचवू शकले नाहीत.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ज्या नेत्यांवर विश्वास टाकला त्यांनीच शेवटच्या क्षणी त्यांच्यापासून फारकत घेतली. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची फौज आपापल्या जिल्ह्यात अडकून पडली. सगळ्यात जास्त सभा धनंजय मुंडे यांना घ्याव्या लागल्या यावरुन अजित पवार यांचे राजकारण अजून तरी कोणाच्या पचनी पडलेले नाही हे स्पष्ट झाले. शेवटच्या टप्प्यात शरद पवार यांना या निवडणुकीसाठी मैदानात यावे लागले यावरुन पक्षाची अवस्था किती बिकट झाली हे लक्षात यावे. शिवसेनेने पाठींबा काढला तर सरकार टिकवण्यासाठी भाजपाला पाठींबा देणार नाही, हे मी लिहून देण्यास तयार आहे, असे शरद पवार यांना सांगावे लागले. पवारांच्या शब्दावर आता किती विश्वास उरला आहे याचे हे बोलके उदाहरण ठरावे. परिणामी पुणे, परभणी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर या पाच जिल्हा परिषदांपुरते राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले.


दोन्ही काँग्रेस संपवण्यासाठी..!

भाजपाचे देशपातळीवरील संघटनमंत्री व्ही. सतीश यांच्याकडे भाजपाच्या काही नेत्यांनी अन्य पक्षातील नेत्यांना दिल्या जाणाऱ्या प्रवेशावरुन तीव्र आक्षेप घेतले होते.
तेव्हा तुम्ही शांत बसा, काँग्रेस मुक्त भारत करायचा असेल तर आधी दोन्ही काँग्रेस संपवाव्या लागतील. त्यामुळे होत असलेल्या प्रवेशांना विरोध करु नका असे सांगून त्यांची रवानगी केली होती. ते वक्तक्य अशा रितीने आता सत्य ठरले आहे..!

Web Title: Rural Maharashtra also rejected Congress, NCP ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.