Women's Day 2019 : मराठवाड्यातल्या ग्रामीण महिला लिहिणार स्वतःच त्यांच्या यशकथा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 07:26 AM2019-03-08T07:26:55+5:302019-03-08T08:11:37+5:30
अल्पशिक्षित ग्रामीण महिलांना लिहित्या करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि स्वयम शिक्षण प्रयोगचा अभिनव उपक्रम
मुंबई: दुष्काळ म्हटला की, जमिनीला गेलेले तडे, आकाशाकडे डोळे लावून बसलेले शेतकरी आणि डोक्यावरून तीन-चार हंडे घेऊन मैलच्या मैल चालणाऱ्या बायका, असेच काहीसे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र दुष्काळाच्या काळात जिथे पुरुष हतबल होताना दिसतात तिथे स्त्रिया मात्र ताकदीने उभ्या राहाताना दिसतात. आजही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी नेटाने आपले संसार चालवतात, परिस्थिती काहीही असली तरी. या दुष्काळाने मराठवाड्यातील अनेक स्त्रियांना कर्तृत्वाने फुलवण्यास मदत केली आहे. याच स्त्रियांना त्यांचं यशोगाथांविषयी लिहिते करण्याचा उपक्रम शासन आणि स्वयम शिक्षण प्रयोग या सेवाभावी संस्थेने हाती घेतला आहे. यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे लातूर,उस्मानाबाद व साेलापूर जिल्ह्यातल्या महिलांसाठी एका 'लेखन संवाद कार्यशाळे'चे आयोजन लातूर येथे अलीकडेच करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत ४० हून अधिक महिलांनी भाग घेतला.
दुष्काळाचा सामना करत मराठवाड्यातल्या ग्रामीण महिला प्रतिकूल पर्यावरणाशी झगडत अनेक महिला सेंद्रिय शेती -अन्नसुरक्षा, शेतीपूरक आणि इतर व्यवसाय, स्वच्छ ऊर्जा,पाणी, स्वच्छता आणि आरोग्य तसेच ग्रामीण विकासाच्या अनेक योजना आपापल्या परिसरात राबवण्यासाठी पुढे येत असून स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य उजळून टाकत आहेत. आपल्या आणि आपल्या सख्यांच्या कथा आणि व्यथा या महिलांनी स्वतःच सांगाव्यात,लिहाव्यात आणि अनेक माध्यमातून समाजापर्यंत पोचवाव्यात या हेतूने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणात महिला बचत गट, कृषी गट, लीडर, उद्योजक महिलांना शब्दात व्यक्त होण्याचे तंत्र, संवाद, वाचनाचे महत्व , स्वानुभवाच्या आधारे लिखाण, मुलाखतीचे तंत्र ,डिजिटल तसेच सोशल मीडियाचे महत्त्व अशा अनेक गोष्टीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला लातूरच्या विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक मीरा ढास, दूरदर्शनचे पत्रकार दीपरत्न निलंगेकर, माजी कृषी अधिकारी रमेश चिल्ले आणि लेखिका यशोधरा काटकर यांनी मार्गदर्शन केले. स्वयम् शिक्षण प्रयोगचे विकास कांबळे,लक्ष्मीकांत माळवदकर आणि अंबिका मुंढे यांचा या कार्यशाळेच्या आयोजनात मोलाचा वाटा होता.
कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी सदैव सज्ज राहावे लागणाऱ्या आपल्या अल्पशिक्षित ,ग्रामीण महिलांना लिहित्या करण्यासाठी आयोजित केलेल्या या पहिल्या-वहिल्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या महिलांचा उत्साह बघण्यासारखा होता अशी माहिती यशोधरा काटकर यांनी दिली. कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या महिला त्यांच्या परिसरातील महिलांच्या यशकथा तसेच सेंद्रिय शेतीचे प्रयोग, उद्योजकतेतली आघाडी , पाणी व स्वच्छता यातील अनेक उत्तम उपक्रम, महिलांना मिळालेले सन्मान,-पुरस्कार अशा अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारे लिखाण आता या महिला स्वतःच लिहितील आणि त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या परिवर्तनाचे अनेक पैलू उलगडून विविध माध्यमातून ते समाजापर्यंत पोहचवणार आहेत. सुरुवातीला स्वयम शिक्षण प्रयोगचे वार्तापत्र 'आम्ही सखी' मधून हे लिखाण प्रसिद्ध होत जाईल आणि पुढे विविध प्रसारमाध्यमातून विकसित होत सकारात्मक परिणाम घडवत समाजाच्या तळागाळापर्यंत झिरपत जाईल अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने वर्षभरात करण्याच्या कामाची आखणीही या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती काटकर यांनी दिली.
माझी पाटी कोरी होती व लिखाण बाल्यावस्थेत होते पण लेखन संवाद कार्यशाळेमुळे लिखाणाला सुरुवात करण्याचा आत्मविश्वास मिळाला. चुकतमाकत का होईन आता आम्ही लिहू लागलो आणि हे आमचे पहिले पाऊल आहे ,पण आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही. आमच्या यशकथा आता आम्हीच लिहिणार आणि इतरांपर्यंत पोचवणार
सुरेख आलुरे, कार्यशाळेत सहभागी महिला