घाई केली, ठाकरेंनी स्वत:चीच कबर स्वतः खोदलेली, उन्मेष पाटलांनी...; गिरीष महाजनांचे प्रत्यूत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 01:39 PM2024-04-04T13:39:57+5:302024-04-04T13:40:27+5:30
Girish Mahajan on Unmesh Patil, Eknath Khadse: एकनाथ खडसे यांच्या दिल्लीत भाजप प्रवेश झाल्याच्या बातम्यांवरही महाजन यांनी भाष्य केले.
खासदारकीचे तिकीट मिळाले नाही म्हणून उन्मेष पाटील यांनी भाजपा सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर तुम्ही लढा आणि जिंकून दाखवा आणि जनता ही आता दाखवेल कोण खरं आणि कोण खोट आहे, असे आव्हान मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.
उन्मेष पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गेले असून त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पाटील यांच्या तिकिटाचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचा होता. भाजपमध्ये आल्यावर त्यांना आमदारकी, खासदारकी आम्ही दिली होती. त्यांनी जाण्याची घाई केली.भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष इथे राहिल्याने गेल्याने कोणाला काही फरक पडत नाही, असे महाजन म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आपली स्वतःची कबर स्वतः खोदली आहे. महायुतीत असताना आमच्याशी गदारी केली. तुम्ही अल्पशा सुखासाठी दुःखात गेला आहात. तुम्ही तुमची कबर स्वतःच खोदली आहे. तुम्ही लढा आणि जिंकून दाखवा आणि जनता ही आता दाखवेल कोण खरं आणि कोण खोट आहे, असे आव्हान महाजन यांनी दिले.
तसेच एकनाथ खडसे यांच्या दिल्लीत भाजप प्रवेश झाल्याच्या बातम्यांवरही महाजन यांनी भाष्य केले. खडसे यांनी दिल्ली येथे भाजपमध्ये प्रवेश केला असून काही इंग्रजी दैनिकांमध्ये या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. एकनाथ खडसे भाजपमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर आमदार झाले होते. मंत्री झाले होते. एकनाथ खडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामासाठी कुठे प्रचारक नव्हते.
त्यांचे मोदींशी, अमित शहा, जेपी नड्डा यांच्याशी संबंध आहेत असे ते म्हणाले होते. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. खडसे यांचे जर मोदी शहा यांच्याशी चांगले संबंध होते तर त्यांना वाईट दिवस का आले? असा सवाल करत त्यांनी दिल्लीत प्रवेश केला याबद्दल मला काही माहीत नाही, असे महाजन म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना चांडाळ चौकडीने घेरले आहे, असे उन्मेष पाटील म्हणालेले. त्यांनी पक्ष सोडला असून ते आता काहीही टीका करू शकतात.
पाटील यांचं तिकीट नाकारण्याची कारणे केंद्रीय नेतृत्वाला माहिती आहेत. मी त्यांना वेळोवेळी सांगितले होते. मी त्यांना समज दिली होती. त्यांच्याशी चर्चा केली होती. ते जर आम्हाला चांडाळ चौकडी म्हणत असेल तर त्यांनी आपलं काय चुकल म्हणून आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा सल्ला महाजन यांनी दिला. उन्मेष पाटील यांनी तिकडे जाऊन फार मोठी चूक केली आहे. आमच्याकडे त्यांना भविष्य होते. त्यांना नंतर कळेल की आपण काही चूक केली, असेही महाजन म्हणाले.