‘रायन’चे सीईओ उच्च न्यायालयात, अटकपूर्व जामिनाची मागणी, शाळेत अल्पवयीन मुलाची हत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 04:55 AM2017-09-12T04:55:13+5:302017-09-12T04:55:35+5:30

गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी शाळा समूहाचे विश्वस्त व त्यांच्या कुटुंबीयांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी घेण्यात येणार आहे.

Ryan's CEO in High Court, Demand for Anticipatory bail, Minor boy murdered at school | ‘रायन’चे सीईओ उच्च न्यायालयात, अटकपूर्व जामिनाची मागणी, शाळेत अल्पवयीन मुलाची हत्या  

‘रायन’चे सीईओ उच्च न्यायालयात, अटकपूर्व जामिनाची मागणी, शाळेत अल्पवयीन मुलाची हत्या  

Next

मुंबई : गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील सात वर्षांच्या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी शाळा समूहाचे विश्वस्त व त्यांच्या कुटुंबीयांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी घेण्यात येणार आहे.
अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी हरियाणा न्यायालयात पोहोचण्यापूर्वीच अटक केली जाईल, या भीतीने शाळा समूहाचे विश्वस्त डॉ. आॅगस्टाईन फ्रॅन्सिस पिंटो (७३) व त्यांची पत्नी ग्रेस पिंटो (६२) यांनी ट्रान्झिट जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. अजय गडकरी यांनी पिंटो कुटुंबीयांच्या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे.
प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येमुळे गुरुग्राममध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पिंटो यांच्या वतीने अ‍ॅड. नितीन प्रधान यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली. संतापलेल्या पालकांनी गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलजवळील दारूच्या दुकानांची तोडफोड केली. तसेच शाळा व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.
प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी बस कंडक्टरला अटक केली. तसेच रायन समूहाचे दोन वरिष्ठ अधिकारी फ्रान्सिस थॉमस व जेयस थॉमस यांना अटक केली. दरम्यान, हरियाणाचे शिक्षणमंत्री राम बिलास शर्मा यांनी गुरुग्राम पोलिसांना प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी रायन ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाºयांवरही गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे आॅगस्टाईन पिंटो आणि ग्रेस पिंटो यांनी उच्च न्यायालयात ट्रान्झिट जामिनासाठी याचिका दाखल केली. ‘१० सप्टेंबर रोजी विश्वस्तांना वर्तमानपत्राद्वारे हरियाणाच्या मंत्र्यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल केलेल्या वक्तव्याची माहिती मिळाली,’ असे पिंटो यांनी याचिकेत म्हटले आहे.
गुन्हा गुरुग्राममध्ये घडल्याने या दोन्ही विश्वस्तांना केवळ हरियाणा न्यायालयच अटकेपासून वाचचू शकते. मात्र हरियाणाला पोहोचण्यापूर्वीच पोलीस अटक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस कारवाई करण्याची शक्यता असल्याने हरियाणा न्यायालयात पोहोचेपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात यावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली आहे. अद्याप विश्वस्तांनी प्रद्युम्नच्या हत्येबाबत कोणतेही अधिकृत निवेदन केले नसले तरी पिंटो यांनी याचिकेत प्रद्युम्नचा मृत्यू ‘दुर्दैवी’ असल्याचे म्हटले आहे. प्रद्युम्नच्या मृत्यूमुळे केवळ त्याच्या पालकांनाच दु:ख झाले नाही, तर त्याच्या मृत्यूचे दु:ख विश्वस्त, शाळेचे कर्मचारी, शाळा व्यवस्थापन आणि अन्य विद्यार्थ्यांनाही झाले आहे, असे पिंटो यांच्या याचिकेत म्हटले आहे. ‘संस्थेच्या ४० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व भल्यासाठी शाळा समूह आवश्यक ती सर्व पावले उचलेल. गुरुग्राम शाळेत सीसीटीव्ही लावल्यानेच मारेक-याला अटक करणे शक्य झाले,’ असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

कारभार शाळा व्यवस्थापन पाहाते

एका कंडक्टरला विद्यार्थ्यांचे शौचालय वापरूच कसे दिले, असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे वादही निर्माण झाला आहे. यावर स्पष्टीकरण देताना पिंटो यांनी याचिकेत म्हटले आहे की, ब-याचदा कंत्राटी कर्मचारीही विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या (शौचालय) सुविधांचा वापर करतात. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर करून दिला जातो. ‘आम्ही मुंबईत राहतो आणि व्यवस्थापनाचा सर्व कारभार मुंबईतूनच पाहिला जातो. शाळेचा दैनंदिन कारभार शाळा व्यवस्थापनाने नियुक्त केलेले स्थानिक कर्मचारी पाहतात,’ असेही याचिकेत म्हटले आहे.

Web Title: Ryan's CEO in High Court, Demand for Anticipatory bail, Minor boy murdered at school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.